मलकापूर-कराड ते अतित-नागठाणे दरम्यानचे सेवा रस्ते, पूल व गटर्सची कामे तातडीने पूर्ण करा; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे महामार्ग अधिकाऱ्यांना निर्देश

by Team Satara Today | published on : 17 May 2026


कराड : आशियाई महामार्ग ६ पदरीकरण अंतर्गत कागल ते शेंद्रे दरम्यानच्या मलकापूर, कराड ते अतित, नागठाणे पर्यंत प्रामुख्याने कराड-तासवडे टोलनाका येथून तासवडे आणि शिरवडेकडे जाणाऱ्या रस्त्याची उंची कमी करून त्याचे रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे. तसेच या मार्गावरील विविध ठिकाणचे सेवा रस्ते, पूल आणि गटर्सची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा कडक सूचना राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

यावर प्रशासनाच्या वतीने कराड येथील ६ पदरी उड्डाणपुलाची एक बाजू लवकरच वाहतुकीस खुली केली जाईल, तसेच इतर सर्व सुचवलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण केली जातील, अशी ग्वाही प्रकल्प संचालकांनी दिली आहे. कागल ते शेंद्रे या महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे स्थानिक शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कराड येथील शासकीय विश्रामगृहात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम आणि प्राधिकरण अभियंता महेश पाटोळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

​यापूर्वी १ मे रोजी तासवडे टोल नाका येथून तासवडे-शिरवडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे आशियाई महामार्गाला समांतर खोलीकरण, रुंदीकरण व डांबरीकरण व्हावे यासह अन्य मागण्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थांनी तासवडे टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी महामार्गाचे अधिकारी, शासकीय अधिकारी आणि शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन यावर योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यानुसार या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

​या बैठकीदरम्यान महामार्गावरील मलकापूर, कराड ते अतित, नागठाणे दरम्यान येणाऱ्या खोडशी, वहागाव, तासवडे टोल नाका, शिवडे फाटा, उंब्रज, कोर्टी, पेरले, काशीळ आदी गावांमधील सेवा रस्त्यांची दुरवस्था, अर्धवट राहिलेली गटर्स आणि पुलांची कामे याकडे माजी मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. स्थानिक नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ही सर्व कामे प्राधान्याने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. यावर उपस्थित प्रकल्प अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही सर्व अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

​या महत्त्वपूर्ण बैठकीला राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील (चिखलीकर), कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष प्रशांत यादव, कराड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग चव्हाण, सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक संजय साळुंखे, पै. संजय थोरात उपस्थित होते. तसेच प्रशासकीय व व्यावसायिक पातळीवरून प्रकल्प संचालक संजय कदम, प्राधिकरण अभियंता महेश पाटोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी आर. बी. धुमाळ, अदानी रोड ट्रान्सपोर्टचे कन्स्ट्रक्शन मॅनेजर राजेश खत्री, प्रोजेक्ट हेड प्रशांत कुलकर्णी, संग्रामसिंह जाधव पाटील, डी. बी. जाधव (बापू), तुषार पवार, शिवाजी जाधव, रमेश अर्जुगडे, कारखान्याचे सिव्हिल इंजिनियर प्रताप चव्हाण, संपर्क प्रमुख आर. जी. तांबे, पी. एस. कोकरे, श्रीमती जे. सी. कदम, नरेंद्र मोरे, अजित घारे, महेश चाबुकस्वार आणि उत्तम कोळी यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एमआयडीसीतील बाबर पशुखाद्य कंपनीवर गुन्हा; पशुखाद्यात युरियाचा वापर केल्याचे उघड

संबंधित बातम्या