​“मी जोसेफ विजय शपथ घेतो की…”; तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी ‘थलापती’ विजय विराजमान

by Team Satara Today | published on : 10 May 2026


चेन्नई: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत आपल्या लोकप्रियतेचा करिष्मा दाखवणारे सुपरस्टार आणि 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाचे सर्वेसर्वा जोसेफ विजय यांनी आज तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची अधिकृत शपथ घेतली. चेन्नई येथील पंडित जवाहरलाल नेहरू मैदानावर सकाळी १० वाजता हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. या ऐतिहासिक प्रसंगी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रमुख उपस्थिती लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

​तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून रंगलेला सत्तास्थापनेचा पेच शनिवारी संध्याकाळी संपुष्टात आला. जोसेफ विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन त्यांना १२१ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सोपवले होते. यापूर्वी विजय यांनी १०८ स्वतःचे आमदार आणि काँग्रेसच्या ५ आमदारांसह ११२ जणांच्या पाठिंब्याचे पत्र दिले होते, मात्र बहुमतासाठी आवश्यक आकडा सिद्ध करण्याच्या राज्यपालांच्या सूचनेनंतर त्यांनी १२१ आमदारांची जुळवाजुळव करून सत्तास्थापनेचा दावा केला. राज्यपाल आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली असून, १३ मे पूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.

​विजय यांच्यासोबतच त्यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या सदस्यांनीही शपथ घेतली. विजय यांचे खंदे समर्थक एन. आनंद यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, तर बास्केटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष आणि विल्लिवाक्कम मतदारसंघाचे आमदार अधव अर्जुन यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत प्रशासकीय कामात आपली छाप पाडण्यास सज्ज झाले आहेत. अर्जुन यांनी निवडणुकीत डीएमकेच्या कार्तिक मोहन यांचा पराभव केला होता. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेले पक्षाचे महासचिव आणि तिरुचेंगोडेचे आमदार अरुण राज तसेच ज्येष्ठ नेते सेंगोत्तैयन यांचाही विजय यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

​राज्याचा सर्वांगीण विकास आणि जनहित जपण्याची शपथ घेतल्यानंतर जोसेफ विजय यांनी उपस्थित जनसागराला अभिवादन केले. या सोहळ्याला राजकीय नेत्यांसोबतच चित्रपट सृष्टीतील मान्यवरांचीही मांदियाळी होती. अभिनेत्री तृषा कृष्णन हिने पारंपरिक दाक्षिणात्य साडीत उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली. तमिळनाडूच्या राजकारणातील या नव्या पर्वाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्याच्या साहिल जाधवचा तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक पराक्रम; आईच्या त्यागाचे चीज करत पटकावले कांस्यपदक
पुढील बातमी
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार; उपाध्यक्षपदी जयश्री चौगुले, अरूण कडू-पाटील, पी. जे. पाटील, मुनताजअली शेख व महेंंद्र लाड

संबंधित बातम्या