९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मार्गदर्शन समिती जाहीर

by Team Satara Today | published on : 16 August 2025


सातारा : राजधानी साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशनच्या वतीने हे संमेलन होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन समितीची घोषणा करण्यात आली आहे.  ९९ व्या संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली  झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. त्यामध्ये ज्येष्ठ विचारवंत व लेखक किशोर बेडकीहाळ, ज्येष्ठ लेखक डॉ. राजेंद्र माने, महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत  यांची निवड करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ९९ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

साताऱ्यात मसाप शाहूुपुरी शाखेच्या १२ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर काही दिवसांपूर्वीच ९९ वे संमेलन साताऱ्यात होणार असल्याचे जाहीर झाले होते. तब्बल ३२ वर्षांनी होणाऱ्या या संमेलनामुळे सातारा जिल्हावासियांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी एकमताने सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड झाली आहे. त्यानंतर संमेलनाच्या तयारीने वेग घेतला असून विविध संस्थासमवेत बैठकाही झाल्या आहेत. संमेलन वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हावे यासाठी मसाप शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन प्रयत्नशील आहे. साताऱ्यातील साहित्य चळवळीला नवसंजीवनी देण्याचे काम मसाप शाहूुपुरी शाखेने केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंना एक लाख पत्रे पाठवणे असो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष निवड बिनविरोध करणे असो, साहित्याच्या व्यासपीठावरुन सामाजिक कार्याला मदत करणे असो असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. साताऱ्यात यापूर्वी ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १९९३ साली झाले होते. त्यावेळी स्वागताध्यक्ष स्व. श्री.छ. अभयसिंहराजे भोसले यांनी काम पाहिले होते. त्यानंतर होणाऱ्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष योगायोगाने त्यांचे सुपुत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आले आहे. या संमेलनाबाबत अखिल भारतीय साहित्य महामंडळाशी योग्य समन्वय रहावा आणि संमेलनाचे नियोजन उत्कृष्ट व्हावे यासाठी मार्गदर्शन समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीमध्ये ज्येष्ठ विचारवंत, लेखक किशोर बेडकिहाळ, ज्येष्ठ लेखक डॉ. राजेंद्र माने, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांचा समावेश आहे. ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांचे मसाप शाहूुपुरी शाखेच्या जडणघडणीत योगदान असून शाखेला नेहमीच मार्गदर्शन असते. विविध अभिनव उपक्रम राबवण्याची संकल्पना त्यांनी शाखेला दिल्या आहेत. 

देश, राज्यातील विविध नामवंत लेखक, साहित्यिक, विचारवंतांशी त्यांचा स्नेह असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच साताऱ्यात विविध साहित्यिक ऐकण्याची संधी सातारकरांनी मिळाली आहेत.  डॉ. राजेंद्र माने हे लेखक असून त्यांची आतापर्यंत २७  पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना २० पेक्षा जास्त विविध पुरस्कार मिळाले आहेत. शासनाच्या मराठी भाषा सल्लागर समितीचे ते माजी सदस्य आहेत. साताऱ्यातील श्री.छ. प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयाचे ते ३० वर्षे संचालक आहेत.  त्याचप्रमाणे विविध साहित्य संस्थांच्या समितीमध्ये त्यांचा समावेश आहे.  मसाप शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत हे शाखेच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. शाखेच्या प्रत्येक कार्यक्रमाचे त्यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे. त्यामुळे मार्गदर्शन समितीमध्ये त्यांची निवड करण्यात आली. हे संमेलन चांगल्याप्रकारे पाड पाडण्यासाठी ही समिती काम करेल अशा शुभेच्छा स्वागताध्यक्ष मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयनेच्या पाण्यावर किल्ल्यांचा इतिहास
पुढील बातमी
उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस

संबंधित बातम्या