मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आगामी 'इमर्जन्सी' सिनेमात दिसणार आहे. कंगना रणौतच्या या सिनेमात श्रेयस माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारत आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर पाहूनच चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. श्रेयसही वाजपेयींच्या भूमिकेत अगदी उठून दिसतोय. सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने श्रेयस तळपदेने मुलाखत दिली. यावेळी त्याने बॉलिवूड पार्ट्यांबाबतीत भाष्य केलं.
कंगना रणौत आणि श्रेयस तळपदेने 'बॉलिवूड हंगामा' ला मुलाखत दिली. यावेळी बॉलिवूडमधील गटबाजीचा विषय निघाला तेव्हा श्रेयस म्हणाला, "मी नेहमीच चांगलं काम करेन हेच ठरवलं. कमी नाही पण चांगलं काम करेन अशीच माझी इच्छा असेल. मी कधीच बॉलिवूडमधल्या गटबाजीत पडलो नाही. मी कधी कोणत्या पार्ट्यांनाही फारसा जात नाही. कारण तिकडे काय बोलणार असा प्रश्न पडतो. कधी कधी फेक गप्पा मारण्यापेक्षा न बोललेलंच बरं असं वाटतं. यापेक्षा मला घरी कुटुंबासोबत वेळ घालवायला जास्त आवडतं."
तो पुढे म्हणतो,"पार्ट्यांना जाऊन काम मिळत नाही. तिथे तुम्हाला फक्त बकवास करायला बोलवतात." यावर कंगना म्हणते, 'असं काही नाही. जसं तुम्हाला पाहिजे तसं नाही मिळणार पण काम तर मिळेल.' पुन्हा श्रेयस म्हणाला, "माझं तर स्पष्ट होतं की फोकस ने आपलं काम चांगलं करायचं आहे. जे काम मला दिलंय ते मी नीट करेन. माझ्यामुळे इतरांचं काम खराब होऊ नये हा माझा प्रयत्न असतो."
श्रेयस तळपदे मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्रीत तग धरुन आहे. दोन्हीतही त्याचं वेगळं स्थान आहे. लवकरच तो 'वेलकम टू जंगल' या सिनेमातही दिसणार आहे. यामध्ये अक्षय कुमारसह बॉलिवूडमधील इतर बरीच स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.