साताऱ्यात होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनास सहकार्य करा - ब्रह्मपुरी येथे डॉ. भारत पाटणकर यांचे आवाहन

by Team Satara Today | published on : 10 March 2026


सातारा  : क्रांतिसिंह नाना पाटील यांची 125 वी जयंती वर्ष, गाडगे बाबा यांचे 200 व्या जयंती वर्ष या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे येत्या मे महिन्यात होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनासाठी रहिमतपूर परिसरातील सजग नागरिकांनी  सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे. 

श्री गाडगे महाराज मिशन संचालित ब्रह्मपुरी आश्रम शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ भारत पाटणकर यांनी उपरोक्त आवाहन केले. अध्यक्षस्थानी श्री संत गाडगे महाराज मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते होते. यावेळी वारकरी संप्रदायाचे राजेंद्र शेलार, विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष ह भ प डॉ. सुहास महाराज फडतरे, संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विजय मांडके , सरचिटणीस ऍड. राजेंद्र गलांडे, प्रा डॉ विजय माने आदि प्रमुख उपस्थित होते. 

डॉ. भारत पाटणकर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी असलेले जिजाबा मोहिते यांचे व क्रांतिसिंह नाना पाटील आणि गाडगेबाबा यांचे असलेल्या वरिष्ठ संबंधांबद्दल गौरवोद्गार काढले. या भूमीला हा इतिहास आहे हे सांगितले. 

महाराष्ट्रातून या संमेलनासाठी येणारे साहित्यिक, लोककलाकार, विचारवंत, राबणारे बहुजन वर्गातील कष्टकरी समाजातील स्त्री पुरुष यांना संमेलनाचे दोन्ही दिवसात काही कमी पडू नये. यासाठी सर्वतोपरी मदत संयोजन समितीला करणार असल्याचे अध्यक्षस्थानी असलेल्या मधुसूदन मोहिते यांनी सांगितले. 

संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विजय मांडके यांनी संमेलनाच्या आयोजना मागची भूमिका विशद केली. संयोजन समितीचे अध्यक्ष हभप डॉ. सुहास महाराज फडतरे यांनी वारकरी  संतांचे विचार हे  विद्रोहीच असल्याचे सांगून  वारकरी संप्रदाय आपल्याबरोबर असल्याचे स्पष्ट केले. 

यावेळी राजेंद्र शेलार, एड. राजेंद्र गलांडे, प्रा डॉ. विजय माने यांचीही भाषणे झाली. सुनील माने, चंद्रहास माने,  मोहसीन शेख, माने, कदम यांनी या संमेलनासाठी सहकार्य करू असे सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खिंडवाडी येथे वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या मृत्यू ; गेल्या आठ वर्षातील ही पाचवी घटना, डोंगरावरील वणवेच कारणीभूत
पुढील बातमी
धुमसणाऱ्या कचरा डेपोवरून सोनगाव ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा; सातारा पालिकेला निवेदन

संबंधित बातम्या