आरक्षण लढ्यात झळाळले शिवेंद्रबाबांचे ‘राजेपण’

by Team Satara Today | published on : 03 September 2025


सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी मुंबईत आरपारची लढाई केली. आरक्षणाबाबतीत पेच निर्माण झाला होता. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तणाव वाढू लागला होता. या सर्व प्रक्रियेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य या नात्याने शिष्टाई करत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व मनोज जरांगे यांच्यात संवाद साधत आंदोलनाची कोंडी फोडली. ‘राजांचा शब्द अंतिम, बाकी आम्ही कुणाला मोजत नाही’ हे जरांगे यांचे उपोषण सोडतानाचे विधान शिवेंद्रराजेंचा रोल सांगून गेले. त्यामुळेच आरक्षणाच्या या लढाईत खर्‍या अर्थाने ना. शिवेंद्रराजे हिरो ठरले, शिवेंद्रराजेंचे ‘राजेपण’ झळाळून निघाले.

मराठा आरक्षणाच्या आजवरच्या आंदोलनात छत्रपती घराण्याचे वारसदार असूनही शिवेंद्रराजेंनी सामान्य मराठ्यांप्रमाणे प्रत्येक आंदोलनात उडी घेतली होती. महाराष्ट्रात जे 54 मूक मोर्चे निघाले त्यातील सातार्‍यातील भव्य असा लाखोंचा मराठा क्रांती मोर्चा छत्रपती उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत निघाला होता. छत्रपती घराण्याच्या या वारसदारांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पहिल्यापासूनच मराठा समाजाबरोबर राहण्याची भूमिका घेतली. शिवेंद्रराजे मुंबईच्या मराठा क्रांती मूक मोर्चातही सामान्य आंदोलकांप्रमाणे सामील होते. भाजप सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर शिवेेंद्रराजेंनी भूमिका बदलली अशी आवई काहींनी उठवली; मात्र प्रत्यक्षात जी भूमिका शिवेंद्रराजेंनी आंदोलक म्हणून बजावली होती त्याच भूमिकेत ते राज्य सरकारमध्येही काम करू लागले. मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री, मराठा आरक्षणाची उपसमिती व जरांगे यांच्यात समन्वय साधण्याची भूमिका व जबाबदारी शिवेंद्रराजेंनीच स्वीकारली होती. त्याचेच प्रत्यंतर जरांगे यांचे उपोषण सोडताना आले.

मुंबईत मराठा आंदोलकांचा ‘सैलाब’ आला असताना संपूर्ण राज्यात हलकल्लोळ माजला होता. मराठा समाजाच्या आंदोलकांचा सरकारवर रोष वाढू लागला होता. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. गिरीश महाजन, ना. मकरंद पाटील, ना. माणिकराव कोकाटे, आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये बैठकांच्या फेर्‍या सुरु होत्या. या सर्वांनी मिळून अत्यंत प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर एकमताने निर्णय घेतले. गेल्या दोन दिवसांपासून जरांगे यांच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील, यावर सविस्तर चर्चा झाली. मात्र कोंडी फुटत नव्हती.

ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यानंतर मात्र मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संवेदनशीलपणे प्रयत्न केले. सातार्‍यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशीही शिवेंद्रराजेेंचा संवाद होता. अनेकदा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतून शिवेंद्रराजेंनी नेमके मराठा समाजाला काय हवे याचीही माहिती जाणून घेतली होती. आरक्षणाच्या प्रश्नांबाबत उपसमितीच्या निर्णायक बैठका झाल्या. मनोज जरांगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधितांशी त्यांनी सातत्याने चर्चा केली. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक मसुदा प्रस्तुत करण्यात आला. या मसुद्याच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्यांचा आदर राखून सुवर्णमध्य साधण्यात आला आहे. यामध्ये ना. शिवेंद्रराजेंची भूमिका निर्णायक ठरली.

मंगळवारी सकाळपासूनच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी शासन सकारात्मक व ठोस पावले उचलत असल्याचे या बैठकीतच स्पष्ट झाले होते. या संदर्भात पुढील निर्णय प्रक्रियेवर सखोल विचारविनिमय करण्यात आला. या बैठकीस ना. शिवेंद्रराजेंसह सरकारमधील त्यांचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मराठा समाजाच्या भावना, अपेक्षा आणि न्याय्य मागण्यांचा सन्मान राखत, कायद्याच्या चौकटीत राहून योग्य निर्णय घेण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आझाद मैदानावर ना. विखे-पाटील यांच्यासोबतच्या शिष्टमंडळात ना. शिवेंद्रराजे अग्रक्रमाने सहभागी झाले होते. यावेळी मनोज जरांगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत शिवेंद्रराजेंनी मोठा सहभाग घेतला. जरांगे यांनीही त्यांना मानसन्मान दिला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जीआर काढण्याचा जो निर्णय झाला, त्यातून ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव मराठा बांधवांच्या मनात कायमस्वरुपी कोरले गेले आहे.

विशेषत: मनोज जरांगे जेव्हा उपोषणाची सांगता करत होते तेव्हा ‘आमच्यासाठी बाबाराजेंचा शब्द अंतिम आहे. बाकी आम्ही कुणाला मोजत नाही’ अशा शब्दात या संपूर्ण प्रक्रियेत शिवेंद्रराजेंनी दिलेले योगदान मनोज जरांगे यांनी अधोरेखित केले. मनोज जरांगे यांच्या या विधानामुळेच या संपूर्ण प्रक्रियेत शिवेंद्रराजेंचा रोल उठून दिसला. मराठ्यांचा राजा म्हणून शिवेंद्रराजेंनी राजासारखीच भूमिका घेतली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाने जाहीरपणे शिवेेंद्रराजेंचे अभिनंदन केले. राजधानी सातार्‍यासाठी तर शिवेंद्रराजेंचा हा रोल आयुष्यभरात स्मरणात राहण्यासारखा ठरला आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्यातील संवादाने सर्वांचेच लक्ष वेधले. सातारा गॅझेट लागू करण्याचा शब्द बाबाराजेंनी दिला आहे. राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी... दुसर्‍या कुणाशी आम्हाला देणं-घेणं नाही. राजासोबत मावळेच हट्टाने भांडू शकतात. छत्रपतींना शिवबा लाडाचं नाव आहे तसेच शिवेंद्रराजेंना मराठे आणि देशातील हिंदू लाडानं बाबाराजे म्हणतात. बाबाराजेंवर आमचा विश्वास आहे. राजे देऊ ना शब्द, असा प्रश्न जरांगेंनी विचारताच खोटा शब्द मी कधी दिलाय का, असा प्रतिप्रश्न ना. शिवेंद्रराजेंनी विचारला. ना. शिवेंद्रराजे आणि जरांगे यांच्यातील संवादाने सर्वांचेच लक्ष वेधले.

आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन सुवर्णमध्य काढण्यासाठी ना. शिवेंद्रराजेंनी निर्णायक योगदान दिले आहे. न्याय्य तोडगा निघेपर्यंत माझा प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक पाऊल समाजाच्या हितासाठीच असेल, मराठा आरक्षण प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे, असा दिलेला शब्द ना. शिवेंद्रराजेंनी पाळला आहे. उपोषणस्थळीही सातारा गॅझेट लागू करण्याचा जाहीरपणे दिलेला शब्द शिवेंद्रराजे पाळतील, असे आंदोलनकर्ते जरांगे यांनी जाहीरपणे सांगितले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घरातून वृद्ध बेपत्ता
पुढील बातमी
जल प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तळ्यात विसर्जन करा: जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या