मेढा : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जावळी तालुक्यातभाजपालाच धक्का बसला असला तरी दोन गट व तीन गण राखण्यात यश आले आहे. तर विरोधी पक्षातील शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्रित लढत मत विभाजन टाळल्याने त्यांना जावळीत चांगले यश मिळाले आहे. शिवसेनेने कुसुंबी गट गणासह काबीज करत ज्ञानदेव रांजणे यांना धक्का दिला तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपल्या घरच्या मैदानात शिल्पा शिंदे या एकमेव राष्ट्रवादीच्या उमेदवार निवडून आणत मैदान राखले.
म्हसवे गटात अपेक्षेप्रमाणे जावळीचे नेते व भाजपाचे उमेदवार वसंतराव मानकुमरे यांनी 2227 मतांनी विजय मिळवला. मानकुमरे यांना 9898 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे संदीप पवार यांना 7671 मते मिळाली. या ठिकाणी अपक्ष उमेदवार संतोष शिराळे यांना 300 मते मिळाली तर 165 मते नोटाला मिळाली. वसंतराव मानकुमरे मोठ्या फरकाने विजयी होतील अशी अपेक्षा असताना मताधिक्य घटल्याने ते नाराज दिसत होते.
म्हसवे गटातील खर्शी बारामुरे गण भाजपाने राखला या गणात भाजपाचे गोरख महाडिक हे विजयी झाले. महाडिक यांना 4429 मते मिळाली तर त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचे विठ्ठल गोळे यांना 3563 मते मिळाली. अपक्ष उमेदवार किरण गायकवाड यांना 213 मते मिळाली. तर नोटाला या ठिकाणी 121 मते मिळाली.
म्हसवे गट भाजपाने राखला असला तरी या ठिकाणी म्हसवे गणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे गाव हुमगाव हे गाव येत असून या ठिकाणी शशिकांत शिंदे यांच्या कुटुंबातील निकटच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा शिंदे यांनी 195 मतांनी विजय मिळवला. शिल्पा शिंदे यांना 4850 मते मिळाली तर भाजपच्या रेश्मा पोफळे यांना 4655 मते मिळाली अपक्ष संगीता भिसे यांना 83 मते मिळाली तर 119 मध्ये नोटाला पडली.
गेली तीन टर्म शिवेंद्रसिंहराजे यांना हुलकावणी देणाऱ्या कुडाळ गटात मात्र भाजपाने एकहाती वर्चस्व राखले. या गटात भाजपाच्या उमेदवार जयश्री गिरी यांनी सर्वात मोठा 6716 मतांनी विजय मिळवला. जयश्री गिरी यांना ११९१७ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीच्या पूनम नायकुडे यांना 5201 मते मिळाली. या ठिकाणी अपक्ष उमेदवार जयश्री शेवते यांनीही 2367 मते घेऊन चांगली कामगिरी केली. नोटालाही 300 मते मिळाली.
कुडाळ गटातील कुडाळ गणात अपेक्षेप्रमाणे प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष व भाजपाचे उमेदवार सौरभ शिंदे यांनी बाजी मारली. सौरभ शिंदे यांना ५२०९ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी शप गटाचे राजेंद्र शिंदे यांना 3132 मते मिळाली. या ठिकाणी शिवसेना उबाठा गटाचे प्रशांत तरडे हे 609 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. अपक्ष राजेंद्र शेवते यांना अवघी 193 मते मिळाली तर नोटाला मतदान करणाऱ्यांची संख्या 138 एवढी होती.
सर्वात धक्कादायक निकाल कुसुंबी गटात लागला हा संपूर्ण गट दोन गणांसह शिवसेनेने काबीज केला. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य व भाजपच्या विद्यमान उमेदवार अर्चना रांजणे यांचा या गटात 180 मतांनी शिवसेनेच्या कविता ओंबळे यांनी पराभव केला. अर्चना रांजणे यांना 8771 मते मिळाली तर कविता ओंबळे यांना 8951 मते मिळाली. अपक्ष कल्पना पार्टे यांना 128 मते मिळाली तर नोटाला 105 मते मिळाली. या विजयाने शिवसेनेला तालुक्यात पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली असून शिवसेना सह संपर्कप्रमुख अंकुश कदम व एकनाथ ओंबळे यांनी जीवाचे रान करत केलेला प्रचार कामी आला तर शिवेंद्रसिंह राजे यांनीही कुसुंबी गटात सातत्याने लक्ष घालून ही त्यांचे सहकारी डी सी सी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव ते रोखू शकले नाहीत.
कुसुंबी गटातील कुसुंबी गण व आंबेघर तर्फ मेढा हा गणही भाजपला गमवावा लागला. आंबेघर तर्फ मेढा गणात शिवसेनेचे आतिश कदम 722 मतांनी विजयी झाले. आतिश कदम यांना 5175 मते मिळाली तर भाजपचे विजय सपकाळ यांना 4453 मते मिळाली.
कुसुंबी गणात अनपेक्षित पणे शिवसेनेच्या सुनीता दुंदळे विजयी झाल्या. भाजपच्या उमेदवार पुष्पा चिकणे यांना 3767 मते मिळाली तर सुनिता दु़ंदळे यांना 4249 मते मिळाली. दुंदळे यांचा 482 मतांनी विजयी झाला.