सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस दमदार हजेरी लावलेल्या पावसाचा जोर मंदावला आहे. २४ तासात नवजा येथे १५, तर महाबळेश्वरला १४ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली आहे, तर सातारा शहरातही पावसाची उघडीप आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला काही भागात पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाची दडी होती. त्यामुळे मान्सूनचा पाऊस सक्रिय कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, तब्बल २० दिवसांनंतर मान्सून सक्रिय झाला. विशेषकरून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाटण, सातारा, जावळी, महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा जोर दिसला.
सोमवारी आणि मंगळवारी या भागात दमदार पाऊस झाला, तर कोयना, नवजा आणि महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जून महिन्यातील हा सर्वांत मोठा पाऊस ठरला. या पावसामुळे ओढे भरून वाहले. तसेच भात खाचरात पाणी साठले. कोयना धरणातही पाण्याची आवक सुरू झाली. पण, बुधवारपासून पावसाचा जोर मंदावला आहे. त्यामुळे पाऊस पुन्हा दडी मारणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२४ तासात कोयनानगर येथे १०, तर नवजाला १५ आणि महाबळेश्वरमध्ये १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत नवजा येथे २१४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. यानंतर महाबळेश्वरला १९३ आणि कोयनेला १४० मिलिमीटर पाऊस पडला आहे. तसेच पाथरपूंज येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
गुरुवारी तर पश्चिम भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. पण, या पावसात जोर नव्हता. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास ५६८ क्यूसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणात १३.९७ टीएमसी पाणीसाठा होता. दोन दिवसांपासून पाणीसाठा स्थिर आहे.
खरीप हंगाम पेरणी लांबणार
सातारा शहरात बुधवारी तुरळक पाऊस झाला, तर गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे सातारकरांना सूर्यदर्शन झाले नाही. सायंकाळपर्यंत शहरात पाऊस झाला नव्हता. जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीवर परिणाम झाला आहे. पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पावसासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.