राज्यात अन्नसुरक्षेसाठी कारवाई आणखी कडक करणार - आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा; नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पोहोचले पाहिजे, हा माझा आग्रह

by Team Satara Today | published on : 18 October 2026


कराड : समाजातील शेवटच्या घटकाला सन्मानाने जगता येईल, यासाठी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गावर सर्वांनी चालले पाहिजे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पोहोचले पाहिजे, हा माझा आग्रह आहे. अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांनी नियमांची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय सुरू करू नये. जर नियमांचे पालन केले नाही, तर कारवाई आणखी कडक केली जाईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येथे दिला.
कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादनप्रसंगी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कऱ्हाडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, कऱ्हाड शहर पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह नगरसेवक, माजी नगरसेवक उपस्थित होते.
आयुक्त मुंढे म्हणाले, ‘नागरिकांना विकले जाणारे अन्न सुरक्षित आणि निर्धारित दर्जाचे असावे, यासाठी यापुढेही तपासणी आणि कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. अन्नसुरक्षेसाठी आमच्या विभागाची भूमिका कठोर असली, तरी नियम पाळणाऱ्या व्यावसायिकांना घाबरण्याचे कारण नाही. मी येणार म्हणून हॉटेल बंद ठेवले असतील तर सर्व नियमांचे पालन होत नाही तोपर्यंत बंदच ठेवावे. जे अन्न विकले जाते ते योग्यच आहे ते विकले जावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
भिवंडी व नाशिक येथील अधिकाऱ्यांच्या कारवाईवर ते म्हणाले, ‘सुपारीचे २०२४-२५ चे प्रकरण होते. काही अधिकाऱ्यांनी सुपारी पकडली होती. तिची विल्हेवाट लावायची होती. त्यावेळी काही तक्रारी आल्या त्यात जेवढी सुपारी पकडली होती त्यापैकी काहीच सुपारी नष्ट केली होती, सर्व नष्ट केलेली नव्हती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.
एफडीए व्यावसायिकांच्या विरोधात नाही
अन्न व औषध प्रशासन कोणत्याही व्यावसायिकाच्या विरोधात काम करत नाही. नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि अन्नसुरक्षेसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग काम करत आहे. खाद्य व्यावसायिकांनी नियमांचे पालन केले, तर त्यांचा व्यवसायही वाढेल आणि नागरिकांनाही सुरक्षित अन्न मिळेल. मात्र, नियमांच्या पालनात कसूर आढळल्यास संबंधितांवर कारवाई केलीच जाईल, असे मुंढे यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाई तालुक्यातील पांडे गावाची साडेतीनशे वर्षांपासूनची ‘उभ्याचे नवरात्र’ परंपरा; सामूहिक श्रद्धेचा उत्सव
पुढील बातमी
फलटण तालुक्यात २५ वर्षांनंतर कापूस शेतीला पुन्हा उभारी; यंदा ८७८ हेक्टरवर लागवड, हमीभावापेक्षा अधिक दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा

संबंधित बातम्या