कराड : ‘माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार हे यूपीए सरकारच्या काळात केंद्रामध्ये मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी केवळ १ लाख ९१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, मोदी सरकारने दहा वर्षांतच १० लाख १५ हजार ८९० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पवार आणि कंपनीने महाराष्ट्रावर नेहमी अन्याय केला असून ते या वयातही खोटे बोलतात,’ अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कराड येथे केली.
शाह म्हणाले की, मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणायचे आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार असल्याने राज्यातही युतीचे सरकार आले तर महाराष्ट्र देशातील क्रमांक एक राज्य बनेल. यासाठी महायुतीला व देवेंद्र यांना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शाह यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली. स्थानिक उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करताना त्यांनी राज्यासाठी फडणवीस यांना साथ देण्याचे आवाहन केल्यामुळे फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचे संकेत शाह यांनी दिल्याचा अंदाज बांधला जात आहे.
अमित शाह म्हणाले की, समर्थ रामदास यांचे पाय या शिराळ्याच्या भूमीला लागले आहेत. समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात महाराष्ट्रातील युवकांना एकत्र करून शिवाजी महाराज यांना पाठिंबा देण्याचे काम केले. त्या समर्थ रामदास यांना मी नमन करतो.