महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता; राज्यातील अनेक प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

by Team Satara Today | published on : 08 July 2026


मुंबई : भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण देशभर सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून राज्यातील अनेक भागांत गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सुरुवातीला जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुलनेने कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि घाटमाथ्याच्या भागांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

या सलग पावसामुळे राज्यातील अनेक प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून काही धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून काही जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 1 ते 6 जुलै या अवघ्या सहा दिवसांत राज्यातील अनेक भागांत जून महिन्याएवढा किंवा त्याहून अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनने जुलैच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, पुढील सहा दिवसही राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा तसेच काही विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही भागांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्टही जारी करण्यात आले आहेत.

प्रशासनाने नागरिकांना नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे, पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास करू नये, तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. विशेषतः डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका आणि सखल भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्क राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दालनात जाऊन सदिच्छा भेट घेतली; भेटीची राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
पुढील बातमी
साताऱ्यात पावसाचा जोर आजही कायम; जिल्ह्यात ८३ घरांचे नुकसान, सहा पशुधन दगावले; महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक ४०७ मिलिमीटर पाऊस

संबंधित बातम्या