सातारा : रा.ना. गोडबोले (सार्व.) ट्रस्ट व सातारा जिल्हयातील नागरिकांतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा सातारा भूषण पुरस्कार हा खऱ्या अर्थाने त्रिवेणी संगमच म्हणावा लागेल कारण गोडबोले परिवाराने सुरू केलेला हा उपक्रम आणि डॉ.सुरेश भोसले यांच्यासारखा कर्तुत्ववान पुरस्कार स्वीकारणारा आणि तेवढ्याच उच्च प्रतीचे काम करणारा त्यांचा कृष्णा परिवार हा खरोखरच एक अनोखा त्रिवेणी संगम आहे, असे उद्गार डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर यांनी काढले.
सातारा भूषण पुरस्कार 2024 प्रदान कार्यक्रम समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र सातारा येथे संपन्न झाला. सातारा येथील ज्येष्ठ उद्योजक व कुपर उद्योगसमूहाचे प्रमुख माननीय फरोख कूपर यांच्या शुभहस्ते व सातारा येथील जेष्ठ विचारवंत व लेखक डाॅ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. ट्रस्टी अशोक गोडबोले, उदयन् गोडबोले, व डॉ.अच्युत गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ट्रस्टचेवतीने आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना डॉ. अच्युत गोडबोले म्हणाले की, आमचे वडील बन्या बापू गोडबोले यांनी स्वतःच्या जीवनात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन स्वत: पन्नातून केवळ 5000 रुपयाचा निधी टाकून सुरू केलेला हा ट्रस्ट आता तिसऱ्या पिढीत मोठा झाला असून ज्याची व्याप्ती एक कोटी रुपयांची झाली आहे. दरवर्षी शालेय मुला-मुलींना तसेच शैक्षणिक संस्थांना ही मदत केली जाते आणि 91 सालापासून हा सातारा भूषण पुरस्कार सुरू करण्यात आला आजचे पुरस्कार प्राप्त भोसले डॉक्टर हे खरोखरच दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व आहे.
कला, क्रिडा, सामाजिक, आध्यात्मिक, औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या व आपल्या उत्तुंग यशाने साताऱ्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना १९९१ पासून हा पुरस्कार दिला जात आहे.
आतापर्यंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, छोटा गंधर्व, सयाजी शिंदे, राजमाता श्री. छ. सुमित्राराजे भोसले, ह. भ. प. बाबा महाराज सातारकर, यमुनाबाई वाईकर, फारूख कूपर, डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रताप गंगावणे, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. रणजित जगताप यासारख्या दिग्गज व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे.
कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख, कृष्णा सहकारी बँक व कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, कृषी व आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रमुख तसेच कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय ते कृष्णा विश्व विद्यापीठ या दैदिप्यमान प्रवासाचे शिल्पकार, कोरोना काळात विशेष रुग्णसेवा करणारे कर्मयोगी व्यक्तिमत्व असे डॉ. सुरेश भोसले, कराड यांना हा 2024 चा 34 वा सातारा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे हा ट्रस्ट चा सुद्धा विशेष बहुमान आहे.
प्रमुख पाहुणे फारुक कुपर यांनी शनिवार पेठ पासून गोडबोले कुटुंब यांचे अनेक संबंध माझ्या परिवाराशी होते. बन्या बापू गोडबोलेंकडून कुपर उद्योग समूहाला मोठ्या प्रमाणात .युनायटेड वेस्टर्न बँकेच्या मदतीने सहकार्य लाभले या कुटुंबाने दिलेली आपुलकी ,संस्कृती ही आम्ही कधीच विसरू शकत नाही.
सत्काराला उत्तर देताना डॉ .सुरेश भोसले म्हणाले की सातारा नावामुळे हा पुरस्कार मी स्वीकारतो आहे, राजधानी असलेल्या सातारकराला हा पुरस्कार घेताना एक विशेष उंची आहे. सातारचे नाव स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतरही मोठे योगदान असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रूपातून पहिला मुख्यमंत्री सातारने दिला. कर्मवीरांची ही शैक्षणिक भूमी ज्यात रयत शिक्षण संस्थेने देशात नावलौकिक मिळवला. देशातील पहिली सैनिक शाळा सातारचीच आणि राज्यातले पहिले मेडिकल कॉलेज हे कराडला आम्ही उभा केले. भौगोलिक दृष्ट्या ही सातारला विशेष महत्त्व असून कोयना, कृष्णा चा उगम आणि सरकारने याची दखल घेत कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन केले. आज गोडबोले परिवाराने ट्रस्टच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला, हा मी व माझ्या सहकाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन तो स्वीकारत आहे. कृष्णा कारखान्याने केलेले उत्कृष्ट काम तसेच कृष्णा रुग्णालयात चाळीस हजारहून अधिक कॅन्सर रुग्णांना मिळालेला आरोग्य सेवेचा लाभ ही आमच्या कामाची पोचपावती आहे. आज जिल्हा पातळीवर अनेक खेडेगावातून कृष्णा या जनजागृती मोहिमेसाठी विशेष कार्यक्षम केंद्रीय उभा करून विशेष करून महिलांची ब्रेस्ट कॅन्सर साठी तपासणी करत आहे, आणि कॅम्प घेत आहे. आज कृष्णा रुग्णालयाच्या वतीने एचआयव्ही एड्सवर दहा वर्षे उपक्रम राबवला कोविड काळातही विशेष व्यवस्था करून रुग्णसेवा दिली ज्यामध्ये अति गंभीर रुग्णांवर उपचार केल्यामुळे कृष्णाचे नाव संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर कोविड काळात घेतले गेले, आज टाटा मेमोरियल सेंटर नंतर कृष्णाचा दुसरा क्रमांक लागतो. कृष्णा परिवाराने व्हिलेज प्रोजेक्ट हाती घेतला असून यामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यसेवा पिण्याच्या पाण्याची योजना, सांडपाणी व्यवस्था, कचरा मुक्ती अभियान यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून अनेक गावात कृष्णा परिवार 100% शौचालय योजना राबवत आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून देशात व प्रदेशातून दिले जाणारे सर्व पुरस्कार या कारखान्याला मिळाले आहेत. यासाठी आपण सर्वांनी दिलेले योगदान व सहकार्य यामुळे ही प्रगती करता आली आहे. आज हा पुरस्कार मी स्वीकारताना मला विशेष आनंद होत आहे. सातारा भूषण पुरस्कार सत्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष भाषणात दत्तप्रसाद दाभोलकर बोलत होते ते पुढे म्हणाले की, आत्तापर्यंत सातारचे नाव विविध प्रकारे पुढे आले. मात्र कृष्णा परिवाराने ते संपूर्ण देशात गेले आहे. कृष्णा परिवाराने सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली गरुड भरारी घेऊन हे आदर्शवत आणि दीपस्तंभ सारखी काम केले आहे गोडबोले ट्रस्टने जात,पात,धर्म न पाहता व्यक्ति व संस्थेच्या कार्याची ओळख संपूर्ण जगाला व्हावी यासाठी हा पुरस्कार देण्याचे आयोजन केले व आज गेली अनेक वर्षे हा पुरस्कार योग्य व्यक्तींना दिला जात आहे, याचा विशेष आनंद वाटतो असे सांगितले. आज सुरेश भोसले यांनी कॅन्सर रुग्णांसाठी सुरू केलेले आरोग्य सेवेचे कार्य हे खरोखरच कौतुकास पात्र ठरणारे आहे. आज तितक्याच तोळा मोलाचे हे काम पथदर्शी प्रकल्पात नावा रूपात येईल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो.
तीस हजार रुपये सन्मानपत्र, रामनामी असे पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ .सुरेश भोसले यांचा यावेळी समर्थ सेवा मंडळ अर्कशाळा, बळीराजा संस्था, कराड येथील संगम हॉटेल्स आदी संस्थांनी विशेष सत्कार केला कोरोना काळातही अतुलनीय कार्य करणाऱ्या या थोर व्यक्तीची निवड रा.ना. गोडबोले ट्रस्टतर्फे अरूण गोडबोले, प्रा. पुरुषोतम शेठ, ना.श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निवड समितीच्या द्वारे करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले. यावेळी याप्रसंगी डॉ. सुरेश भोसले यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांचा सत्कार डॉ. अनुराधा भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाहक समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, प्रवीण कुलकर्णी, संतोष वाघ, डॉ. सौ. गौरी ताम्हणकर डॉ.चैतन्य गोडबोले, उदयन गोडबोले, प्रकाश बडेकर, डॉ. स्नेहा गोडबोले, संजीवनी गोडबोले ,प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, प्रा.अविनाश लेवे, गौतम भोसले, श्रीकांत शेटे, अनिल काटदरे, कृष्णा सहकारी साखर कारखाना तसेच कृष्णा रुग्णालयाचे संचालक पदाधिकारी कर्मचारी सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.