सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर महामार्ग वाहतूक पोलिसांकडून पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे वाहनांची डिक्की उघडून तपासणी सुरू झाली असून, 'सातारा टुडे'च्या एका जागरूक वाचकाने थेट कॅमेऱ्यासमोर पोलिसांना कायद्याचा जाब विचारत त्यांची चांगलीच भंबेरी उडवून दिली.
काही महिन्यांपूर्वी आनेवाडी आणि खेड शिवापूर टोलनाक्यावर मद्य तपासणी व विविध कारणांच्या नावाखाली महामार्ग वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांची केली जाणारी बेकायदेशीर झडती आणि अडवणूक याविरोधात 'सातारा टुडे'ने वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठवला होता. या दणक्यानंतर काही काळ ही तपासणी थांबली होती. मात्र, काही दिवसांपासून टोलनाक्यावर पुन्हा वाहतूक पोलिसांचे पथक ठाण मांडून बसले असून प्रवाशांच्या गाड्या अडवून त्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
खेड शिवापूर टोलनाक्यावर आज कर्नाटक पासिंग असलेल्या एका ग्रँड विटारा वाहनाला थांबवून महामार्ग पोलिसांनी गाडीची डिक्की उघडण्यास लावली. डिक्की उघडून आतील साहित्याची तपासणी सुरू असतानाच तिथे उपस्थित असणाऱ्या एका जागरूक प्रवाशाने थेट पोलिसांना जाब विचारला. मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक पोलिसांना प्रवाशांच्या वाहनाची डिक्की उघडून झडती घेण्याचा अधिकार नसताना आणि महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक ( महामार्ग वाहतूक) यांचे स्पष्ट परिपत्रक असताना तुम्ही कोणत्या अधिकारात डिक्की तपासत आहात, असा रोकडा सवाल त्या प्रवाशाने केला. एवढेच नव्हे तर 'सातारा टुडे'ने बेकायदेशीर तपासणीविरोधात वृत्त प्रसिद्ध केल्याची आठवण करून देत, कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवर नेमप्लेट आणि बक्कल नंबर नसल्याकडेही अंगुलीनिर्देश केला.
अचानक झालेल्या या कायदेशीर भडिमारामुळे डिक्की तपासणाऱ्या पोलिसांची एकच धांदल उडाली. प्रवाशाच्या प्रश्नांना कोणतेही समाधानकारक उत्तर देता न आल्याने अखेर पोलिसांनी "आमच्या वरिष्ठांशी बोला" अशी पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला. टोलनाक्यावर सर्वसामान्य प्रवाशांवर अरेरावी करणाऱ्या पोलिसांची या जागरूक नागरिकाच्या थेट प्रतिकारामुळे चांगलीच पंचाईत झाली. महामार्ग पोलिसांच्या या बेकायदेशीर तपासणीला चाप लावण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता प्रवासी वर्गातून पुन्हा जोर धरू लागली आहे.
खेड शिवापूर टोलनाक्यावर महामार्ग पोलिसांची बेकायदेशीर वाहन तपासणी; 'सातारा टुडे'च्या वाचकाने जाब विचारताच पोलिसांची पळता भुई थोडी
by Team Satara Today | published on : 07 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा