सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असून, २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ९१ मि.मी.ची नोंद झाली. त्याचबरोबर कोयनेतही पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजातून विसर्ग घटवण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ११ वाजता सहा दरवाजे चार फुटांवरून दोन फुटांपर्यंत खाली घेण्यात आले. तर २४ तासांत कोयना धरणात सुमारे सव्वादोन टीएमसी पाण्याची आवक झाली. धरणात ९२.७० टीएमसी साठा झाला होता.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सातारा शहरातही दोन दिवसांपासून उघडीप आहे. यामुळे १५ दिवसांनंतर शहरात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच आहे. मात्र, या पावसाला जोर नाही. कास, तापोळा, बामणोली, कोयना, नवजा, जोर, पाथरपुंज, महाबळेश्वरसह कांदाटी आणि कोयना खोऱ्यात पावसाची उघडीप आहे. प्रमुख धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. यामुळे धरणांतून विसर्ग घटवण्यात आलेला आहे. तरीही यावर्षी धरणात समाधानकारक पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण नाही.
शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४८ तर नवजा येथे ९१ मि.मी. पाऊस झालेला आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात २५ हजार ५०८ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ९२.७० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाऊस कमी झाल्याने धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता दरवाजे तीन फुटांपर्यंत खाली घेण्यात आले. त्यातून १८ हजार ३३७ आणि पायथा वीजगृहाच्या एका युनिटमधून १ हजार ५० असा एकूण १९ हजार ३८७ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, कण्हेर आणि उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने उघडीप घेतली आहे. २४ तासांत धोम धरण क्षेत्रात २ मि.मी., बलकवडी १५ मि.मी. आणि तारळी धरण परिसरात ९ मि.मी. पर्जन्यमान झाले. तर सहा प्रमुख धरणांत १३३ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणांत जवळपास ९० टक्के साठा झालेला आहे. कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या सहा प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.