सातारा : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळ ही संस्था सध्या आपला अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता संस्थेच्या वतीने सातारा येथील राजवाडा परिसरातील श्री समर्थ सदन सांस्कृतीक केंद्र येथे श्री शतचंडी यागाचे आयोजनाने होत आहे.
अमृत महोत्सवीय सोहळा व शाकंभरी नवरात्र पर्वणी निमित्त हा भव्य शतचंडी याग मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 ते गुरुवार दि. 9 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी दिली.
या कार्यक्रमामध्ये मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी सकाळच्या सत्रात सकाळी आठ ते नऊ या वेळेत प्रायश्चित्त, प्रधान संकल्प, पुण्याहवाचन होऊन सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या वेळेत उत्सव मूर्ती प्रतिष्ठापना तसेच देवतांना आवाहन करून त्यांचे पूजन केले जाणार आहे. सायंकाळच्या सत्रात दुपारी तीन ते साडेपाच या वेळेत सार्वजनिक कुंकुमार्चन सोहळा देवीला होणार आहे. ज्या भाविकांना या कुंकुमार्चन सेवेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी समर्थ सदन सातारा येथे सहा जानेवारी पूर्वी संपर्क साधावा.
समर्थ सदनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शतचंडी यागाचे तयारीचे काम अंतिम टप्प्यात आले असून समर्थ सदन हॉलमध्ये श्री देवीचे प्रतिष्ठापनेसाठी आकर्षक भव्य असा मंडप सजवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
शतचंडी साठी केले जाणारे होम व हवनासाठी मोठ्या रूपातील यज्ञकुंडही बनवण्यात आले असून सदन मधील दक्षिणेच्या उजव्या बाजूला यानिमित्त होणाऱ्या कीर्तन, प्रवचन सेवेसाठी भव्य मंच सजवण्यात येत आहे. विविध फुलांच्या आकर्षक सजावटींनी हा परिसर विशेष आकर्षित असा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
शतचंडी यागाची माहिती देणारे भव्य फलक तसेच स्वागत कमानी सातारा शहरात प्रमुख चौकाचौकात लावण्यात येत असून ज्या समर्थ भक्तांना तसेच सातारा जिल्ह्यातील देवी भक्तांना या सोहळ्यात केल्या जाणाऱ्या सार्वजनिक स्वरूपातील कुंकुमार्चन सोहळ्यासाठी यायचे आहे त्यांनी या सोहळ्यात अगोदर नाव नोंदणी करावी व त्यासाठी 9422608951, 9404873978 या फोन नंबर वर संपर्क करावा असे आवाहन श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने याग महोत्सव समितीचे संयोजकांनी केले आहे.