कोरेगाव, दि. ९ : चंचळीतील ग्रामस्थ सौरऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झाले असून सोमवारी दुपारी महादेवाच्या डोंगरावर सुरू करण्यात आलेल्या पवनचक्की प्रकल्पाचे काम बंद पाडले आणि तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले. या संदर्भात माहिती देताना चंचळीतील ग्रामस्थांनी सांगितले की, लॉकडाऊन असताना प्रशासनाने बेकायदेशीररित्या महादेवाच्या डोंगराच्या पश्चिमेकडील बाजू महावितरण कंपनीच्या सौर ऊर्जा कंपनीस सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भाडेपट्ट्याने दिली आहे. ग्रामस्थांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. वास्तविक चंचळी गावाचे महादेव हे दैवत असून दरवर्षी डोंगरावर यात्रा भरते. मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्व भागातून जात आहे. सोमवारी सकाळी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अधिकारी व कर्मचारी साहित्य घेऊन आले होते. कागदोपत्री त्यांना पश्चिम बाजूची जागा देण्यात आली असली तरी त्यांनी बेकायदेशीरपणे पूर्वेच्या बाजूस कामास सुरुवात केली. ग्रामस्थांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी तात्काळ महादेवाच्या डोंगराकडे धाव घेतली आणि तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यांनी पश्चिम बाजूकडील जागा ओबडधोबड आणि चढ उताराची असल्याने आम्हास नको आहे, पूर्वेकडील बाजू समतल आणि चांगली आहे. त्यामुळे आम्ही तिथे काम सुरू करत असल्याचे सांगताच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी काम बंद पडले आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले. या संदर्भात ग्रामस्थ आक्रमक झाले असून आम्ही महादेवाच्या मंदिराकडे जाणारा रस्ता कदापी बंद होऊ देणार नाही, याबाबत लवकरच विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार असून कोणत्याही परिस्थितीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
महादेवाच्या डोंगरावरील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले
चंचळीतील ग्रामस्थ आक्रमक; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले
by Team Satara Today | published on : 09 September 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा