46 वर्षे घरकुलाची प्रतीक्षा; सरकारी जमिनीवर मात्र हॉटेल, गोडाऊन अन् व्यावसायिक वापर!

वाई तालुक्यातील वेळे गावातील गट नं. 503/1 प्रकरण; न्यायालयीन आदेश असतानाही बांधकाम सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

by Team Satara Today | published on : 21 September 2026


सातारा : एका बाजूला सरकारी जागेवर घरकुलासाठी तब्बल 46 वर्षांपासून ग्रामस्थांची प्रतीक्षा, तर दुसर्‍या बाजूला त्याच शासकीय जमिनीवर कथित अतिक्रमण करून हॉटेल, पाण्याचा प्लांट, गोडाऊन, घोड्यांचा गोठा आणि व्यावसायिक बांधकामे सुरू असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. वाई तालुक्यातील मौजे वेळे येथील गट क्रमांक 503/1 या शासकीय जमिनीच्या प्रकरणाने प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकरणाची माहिती येथील ग्रामस्थ दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयाच्या जैसे थे आदेशानंतरही या जागेचा व्यवसायिक वापर विरोधकांकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला .
वेळे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की सन 1980 मध्ये लोकसंख्या वाढीचा विचार करून सुमारे तीन एकर क्षेत्र घरकुलासाठी मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी काही घरकुलांना परवानगी मिळाली; मात्र सर्वसामान्य ग्रामस्थांना घरासाठी जागा मिळण्याचा प्रश्न आजही कायम आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 46 वर्षांपासून ते शासनाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.
दरम्यान, याच शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून व्यावसायिक वापर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हॉटेल, पाण्याचा प्लांट, हॉटेल गोडाऊन, घोड्यांचा गोठा तसेच नवीन बांधकामे उभारण्यात आल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. काही ठिकाणी वीज जोडणीही करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, संबंधित जागेबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. असे असतानाही बांधकामे व व्यावसायिक वापर सुरू राहिल्याने न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी कोण करणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, महसूल विभाग व संबंधित यंत्रणांकडे तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, बेकायदा बांधकामे व व्यावसायिक वापर थांबवावा आणि शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करावी, अशी मागणी केली आहे.
या पत्रकार परिषदेला दीपक पवार, दशरथ पवार, सुरेश पवार, अनुप ढमाळ, दत्तात्रय लांडगे, दत्तात्रय पवार, विश्वास मोरे, अजित पवार, मयुर पवार, संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडमधील दुचाकी चोरांच्या टोळीला जिल्हाबंदी; सातारा-सांगलीत वर्षभर प्रवेशबंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईला वेग
पुढील बातमी
खोकडवाडी येथील अपघातात एकाचा मृत्यू; सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद

संबंधित बातम्या