सातारा : शेतीपंपाच्या मोटारीची सुमारे 100 मीटर लांबीची कॉपर केबल चोरून ती जाळून त्यातील तांबे वेगळा करत विक्रीसाठी निघालेल्या दोघांना वाई पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. समीर सुरेश तुपे (वय 20) आणि राहुल दादाराव पांचांगे (वय 24, दोघेही रा. गुरेबाजार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी, वाई) अशी संशयितांची नावे आहेत.
तारांगण सहकारी गृहनिर्माण सोसायटी, सिद्धनाथवाडी येथील पार्किंगमध्ये ठेवलेली निळ्या रंगाची 2.5 एमएम जाडीची तीनफेज कॉपर केबल चोरीला गेल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार 14 ऑगस्ट रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 228/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.
वाई परिसरात शेतीपंपांच्या केबल चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला. पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्या पथकाने बातमीदारांचे जाळे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला.
दरम्यान, चोरीच्या केबलमधून वेगळा केलेला तांबा विक्री करण्यासाठी दोन इसम पसरणी रोड परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पसरणी रोडवर सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून दोघांना तांब्याच्या तारांसह पकडले.
चौकशीदरम्यान दोघांनी 10 ऑगस्ट रोजी पहाटे तारांगण सोसायटीच्या पार्किंगमधून सुमारे 100 मीटर लांबीची कॉपर केबल चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेली केबल जाळून त्यातील तांबे वेगळा केला आणि तो विक्रीसाठी आणल्याचेही तपासात समोर आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलिस कॉन्स्टेबल नितीन कदम, विक्रम धोत्रे, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, मारोती लोलापोड आणि उमेश लोखंडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पदवीधर अंमलदार लोलापोड करीत आहेत.