अवकाळीने सातारा जिल्ह्याला झोडपले; विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी; तीन तास वीजपुरवठा खंडित, नागरिकांची तारांबळ

by Team Satara Today | published on : 13 May 2026


सातारा  : सातारा जिल्ह्यात बुधवारी दुपारनंतर अचानक बदललेल्या हवामानामुळे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह कराड, वाई, जावली आणि खंडाळा तालुक्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने वातावरण ढवळून निघाले. सुमारे तासभर सुरू राहिलेल्या या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, मात्र वादळी वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले.

दुपारपर्यंत जिल्ह्यात प्रचंड उकाडा जाणवत होता. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले होते. बुधवारी सायंकाळी अचानक काळ्या ढगांनी आकाश व्यापले आणि काही वेळातच धुळीचे वादळ सुरू झाले. रस्त्यांवर धुरळा उडाल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. अनेकांनी दुकाने आणि घरांच्या आडोशाला धाव घेतली.कोंडवे, ता. सातारा येथे मुसळधार पावसात वीज कोसळून हनुमंत मासाळ या मेंढपाळाच्या 22 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या .कोंडवे गावातून डोंगर भागाच्या दिशेने जात असताना अचानक झालेल्या या घटनेने मासाळ थोडक्यात बचावले असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे

यानंतर सुरू झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणी साचले. काही भागांत झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटनाही घडल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीजवाहिन्यांवर परिणाम झाल्याने सातारा शहराच्या पश्चिम भागात तब्बल तीन तास वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना अंधार आणि उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.

या अवकाळी पावसाचा परिणाम शेती क्षेत्रावरही जाणवू लागला आहे. विशेषतः आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वाऱ्यामुळे झाडांवरील फळांची गळती वाढल्याने हंगामावर परिणाम होणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबत मिश्र संकेत दिले आहेत. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली

आहे. अंदाजानुसार राज्यात सुमारे ९२ टक्के पर्जन्यमान नोंदवले जाऊ शकते. मात्र, अंदमान परिसरात मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची चिन्हे दिसत असून, पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या परिस्थितीमुळे त्याचा परिणाम आता जाणवू लागल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा; विजेच्या धक्क्यात १८ मेंढ्यांचा मृत्यू; जिल्हा रुग्णालयात झाडे कोसळली, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
पुढील बातमी
सातारा पालिकेत सत्ताधाऱ्यांचाच रणसंग्राम; बनकर विरुद्ध खंदारे संघर्षाने सभागृह दणाणले; दोन तासांच्या गदारोळात १५ विषय मंजूर

संबंधित बातम्या