खंडाळा : पुण्यातील हिंजवडी येथे उघडकीस आलेल्या ११ लाख ५५ हजार रुपयांच्या एमडी ड्रग्स प्रकरणाचे थेट खंडाळा कनेक्शन समोर आले असून पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंजवडी पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य संशयितांच्या खंडाळा येथील घरावर आणि वास्तव्याच्या ठिकाणी छापा टाकून तब्बल २ लाख ८४ हजार ५०० रुपये किमतीचे २८.४५ ग्रॅम एमडी ड्रग्स हस्तगत केले आहे.
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, हिंजवडी परिसरातील मुक्ताईनगर येथे ११ जून रोजी एमडी ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या अक्षय प्रदीप धायगुडे (वय ३१), दयानंद उत्तम धायगुडे (वय ३८) आणि महेश पुणाराम किचड ऊर्फ बिश्नोई (वय २१, सर्व राहणार अहिरे, ता. खंडाळा) या तिघांना हिंजवडी अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले होते.त्यावेळी त्यांच्याकडून ६१.७० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्स, एक चारचाकी वाहन आणि तीन मोबाईल असा एकूण ११ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली असता, या अमली पदार्थांच्या तस्करीची पाळेमुळे थेट खंडाळा तालुक्यात पसरल्याची कबुली संशयितांनी दिली. तसेच या गुन्ह्यात अशपाक ऊर्फ मोन्या काझी (रा. अहिरे) आणि हनुमान किलेरी ऊर्फ बिश्नोई (रा. खंडाळा) हे दोघेही सामील असल्याचे निष्पन्न झाले.
विशेष म्हणजे या आंतरजिल्हा ड्रग्स रॅकेटमध्ये खंडाळा तालुक्यातील अहिरे गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दयानंद उत्तम धायगुडे यांचे नाव समोर आल्याने आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.या खळबळजनक माहितीनंतर हिंजवडी पोलीस आणि खंडाळा पोलिसांनी संयुक्तरित्या खंडाळा येथील संशयितांच्या निवासस्थानांवर छापा टाकला. या झडती दरम्यान पोलिसांना आणखी ३ लाख रुपयांच्या घरात असणारा अमली पदार्थांचा साठा मिळून आला. या कारवाईमुळे खंडाळा तालुक्यात छुपे अमली पदार्थांचे मोठे जाळे कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण गुन्ह्याप्रकरणी अक्षय धायगुडे, दयानंद धायगुडे, महेश बिश्नोई, अशपाक काझी आणि हनुमान बिश्नोई या पाच जणांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराचा आणि सातारा जिल्ह्यातील त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.