मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात कराड तालुका स्तरावर सावरघरला प्रथम क्रमांक; खोडजाईवाडी द्वितीय

by Team Satara Today | published on : 24 May 2026


कराड : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये कराड तालुका स्तरावर सावरघर ता. कराड गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक खोडजाईवाडी गावाने पटकावला आहे. विशेष म्हणजे सावरघर हे गाव पुनर्वसित गाव आहे. या गावाने एकजुटीने गावात राबवलेले अनेक उपक्रम, माळरानावर फुलवलेली वृक्षराई तसेच ग्रामपंचायतीने गावातील पाणी, रस्ते, वीज, घनकचरा, सांडपाणी याचे केलेले व्यवस्थापन यामुळे सावरघरने प्रथम क्रमांक पटकावला.

दरम्यान, याबाबतचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सरपंच जगन्नाथ सप्रे, उपसरपंच रामदास बाबर, माजी सरपंच सुहास पाटील तसेच ग्रामस्थ, गणेश मंडळ, देवस्थान ट्रस्ट यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून कार्यक्षमता वाढविणे, स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

सर्व घरांना नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा सौर ऊर्जेच्या वापरातून वीज देयके शून्यावर आणणे, पाणीस्त्रोतांचे बळकटीकरण अपारंपरिक ऊर्जेचा वापर, वृक्ष लागवड व संवर्धन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्लास्टिकचा वापर बंद, ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सुविधा शाळा व अंगणवाड्यांचा दर्जा उंचावणे, सौर ऊर्जेचा वापर आदी शासनाच्या निकषामध्ये सावरघर गावाने सर्वाधिक गुण मिळवल्याने गावाला प्रथम क्रमांक देण्यात आला. तसेच खोडजाईवाडी ही शासनाच्या विविध निकषामध्ये योग्य ठरली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाई तालुक्यातील घटना; वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज लंपास केला
पुढील बातमी
राज्यातील आपत्ती काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम; ना. मकरंद पाटील यांची माहिती, मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

संबंधित बातम्या