सातारा : चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सातारा जिल्ह्यांतर्गत मौजे मळे, कोळणे व पाथरपुंज मधील ज्या बाधितांनी रोख रक्कम घेऊन स्वत: पुनर्वसीत होण्याचा पर्याय-1 स्विकारला आहे अशांसाठी जोपर्यंत प्रत्यक्ष मोबदला मिळत नाही तोपर्यंत नवीन बंदी दिनांक समन्वयाने ठरवावा त्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी लोकांशी वाटाघाटी व चर्चा करावी असे सांगून ज्या खातेदारांनी गावठाणांमध्ये जागा पसंत केली आहे अशा ठिकाणी संबंधित यंत्रणेने खातेदारांना प्रत्यक्ष घेऊन जावे व जागेच्या हद्दी निश्चित कराव्यात. एकदा तत्वत: जागा पसंत पडली की त्या ठिकाणी सर्व नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पाटण तालुक्यातील मौजे कोळणे, मळे व पाथरपुंज गावातील पुनर्वसनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वन्यजीव संरक्षक स्नेहलता पाटील, उपवनसंरक्षक आदिती भरद्वाज, भूसंपादन अधिकारी मनोहर गव्हाड, प्रांताधिकारी सोपान टेंबे, तहसीलदार अनंत गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 मध्ये पुनर्वसन लाभ क्षेत्रात करण्याबाबत तरतूद आहे तथापि अभयारण्याच्या बाबतीत सिचंन प्रकल्पासारखे लाभ क्षेत्र नसल्यामुळे पुनर्वसनाकरीता पर्यायी जागा मिळणे फार अवघड ठरत असल्याने अभयारण्य राष्ट्रीय उद्याने तथ अन्य वन्य प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबाचे पुनर्वसन धोरणासाठी पर्याय 1 व पर्याय-2 स्विकारण्याबाबात शासन निर्णय झाला आहे. यामध्ये पर्याय -1 स्विकारणाऱ्या प्रति कुटुंबाला 15 लक्ष रोख घेऊन स्वत: पुनवर्सन होऊ इच्छित असणाऱ्या कुटुंबाचा समावेश असणार आहे. तर पर्याय-2 च्या तरतूदीप्रमाण प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाकरीता नागरी सुविधांसह पर्यायी जमिन वन विभागाने उपलब्ध करुन देण्याची तरतूद आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सातारा जिल्यांतर्गत मौजे मळे, कोळणे व पाथरपुंज बाधित गावतील 50 खातेदारांनी पर्याय-1 स्विकारलेला आहे. यापैकी 12 कुटुंबांना 10 लक्ष रुपयांप्रमाणे रक्कम वितरीत झाली आहे. उर्वरित सदरचा पर्याय निवडलेल्या खातेदारांच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्री यांनी या बैठकीत दिले. पर्याय-2 स्विकारलेली कुटुंबे 275 असून त्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यापैकी 116 कुटुंबांच्या प्रस्तावाला मंजूरी प्राप्त झाली आहे.
मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांच्या वतीने जमीन वळती करणासाठीचा प्रस्ताव सादर केला असून मौजे मळे गावाचा प्रस्तावास मंजुरी प्राप्त झाली आहे. प्रकल्पग्रस्तांनी पसंद केलेल्या कराड तालुक्यातील मौजे खराडे येथील जमीनीचे सपाटीकरणाचे तसेच प्राथमिक नागरी सुविधांच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सांगितले.