सातारा : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज राज्यभर मतदान पार पडले. या निवडणुकांमध्ये राज्यभरातील कोट्यवधी मतदार सहभागी झाले असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शेकडो जागांसाठी मतदान पार पडले.
याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कोडोली - धनगवाडी गावाने लोकशाहीबाबत आदर्श उदाहरण घालून दिले. कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेतील ११, अंगणवाडी आणि ग्राम पंचायत कार्यालयाच्या ग्रंथालयातील मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. धनगरवाडीच्या सरपंच सुवर्णा अश्रुप शेंडगे यांनी सकाळी ७:३० वाजता सुरूवातीलाच सर्वांत पहिले मतदान केले. निता बळीराम खरात या कोडोली गटाच्या भाजपप्रणीत उमेदवार यांनीदेखील कोडोली जि. प. शाळेच्या मतदान केंद्र क्रमांक २७ वर मतदान केले. कडेवर लहान बाळांना घेऊनदेखील तेजस्वी मतदारमातांनी मतदानाचा हक्क बजावला. दिव्यांग, अपघातग्रस्त आणि वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांनीही जोशपूर्ण वातावरणात मतदान केले.
गावात एकीकडे निकिता रंगनाथ माने यांचा विवाह सोहळा उत्साहात सुरू होता, तरीदेखील गावकऱ्यांनी मतदानाचे कर्तव्य प्राधान्याने पार पाडले. गलांडे परिवारातील अक्षया संजय गलांडे नामक कन्येचा उद्या विवाहसोहळा देवकरवाडी येथे असून आज देवकार्य आणि अन्य धार्मिक विधींची लगबग असतानाही मतदानाचे कर्तव्य पार पाडून वऱ्हाडी देवकरवाडीला गेले. लग्नाच्या आनंदातही मतदानासाठी नागरिक मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर पोहोचले. पुणे, मुंबईहून मतदान करण्यासाठी नागरिकांनी हजेरी लावली.
दरम्यान, गावातील कलावती शंकर शेंडगे (८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडल्यानंतरही कोडोलीकरांनी मतदानासाठी हजेरी लावली. दुःखद प्रसंग असतानाही लोकशाही कर्तव्याला प्राधान्य देत गावकऱ्यांनी जागरूकतेचा आदर्श घालून दिला.
लग्नसोहळ्याचा आनंद, दुःखद प्रसंगाची वेदना आणि लोकशाही कर्तव्याची जाणीव अशा वेगवेगळ्या परिस्थितीत कोडोलीकरांनी दाखवलेली जबाबदारी आणि एकजूट प्रेरणादायी ठरत आहे. शेवटची माहिती मिळाली तेव्हा कोडोली केंद्रावरील मतदान ५४ टक्के झाले होते. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान किती महत्त्वाचे आहे, याचा वस्तुपाठ कोडोलीकरांनी, सातारकरांनी घालून दिला.