खोटे वजन दाखवून जरंडेश्वर शुगर मिल्सची फसवणूक; कोरेगाव तालुक्यातील तीन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 December 2025


कोरेगाव  : उसाचे खोटे वजन दाखवून, चिमणगाव, ता. कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सची एक लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्यातील वजनकाटा कारकून, त्याचा साथीदार व ट्रॅक्टरमालक यांच्यावर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जरंडेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून, 50 टनी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर दर्शन प्रताप शेडगे हा कारकून काम करत होता. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत रात्रपाळीदरम्यान शेडगे याने आपल्या साथीदारांशी संगनमत करून, उसाचे खोटे वजन दाखवले. वजनकाट्यावर जास्त वजनाच्या ट्रॉलीचे वजन घेत होता. मात्र, टोकन पंच केल्यानंतर, ट्रॅक्टरचालक निघताच, शेडगे हा त्याचा मित्र रोहन विजय पवार याच्या ट्रॅक्टरचा टायर नंबर कम्प्युटरमध्ये टाकत होता. कारखान्यात न आलेल्या पवार याच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला आधीच्या जड ट्रॉलीचे वजन लावले जात होते. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आला. त्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने केलेल्या चौकशीत शेडगे आणि पवार यांनी या प्रकाराची तोंडी व लेखी कबुली दिली. या पद्धतीने तिघांनी संगनमत करून, पाच ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये प्रत्येकी सहा टन, असे एकूण 30 टन खोटे वजन दाखवून, कारखान्याची आर्थिक फसवणूक केली, अशी तक्रार कारखान्याचे कार्यालय अधीक्षक संदीप सावंत यांनी नोंदवली आहे. याप्रकरणी दर्शन प्रताप शेडगे (रा. चिमणगाव), रोहन विजय पवार (रा. वाघजाईवाडी) आणि सतीश नारायण चव्हाण (रा. एकंबे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नचिकेता एज्युकेशन सार्वजनिक धर्मादाय संस्थेत साडेचार कोटी रुपये रकमेच्या अपहारप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल
पुढील बातमी
गोव्‍यातील नाईट क्‍लबमध्‍ये अग्नितांडव; भीषण आगीत ४ पर्यटकांसह 25 जणांचा होरपळून मृत्यू, - मुख्य महाव्यवस्थापकासह तीन कर्मचाऱ्यांना अटक

संबंधित बातम्या