उंब्रज : मुलींचा घसरता जन्मदर ही चिंतेची बाब आहेच, शिवाय मुलींच्या शिक्षणावर भर देण्याचा काही पालकांचा विचारही कमी होत आहे. या संदर्भात बेटी बचाओ बेटी पढाओ ! या शासनाच्या उपक्रमाला १० वर्ष पूर्ण झाल्याने, जनजागृती करण्याची मोहिम उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून कन्या शाळा उंब्रज च्या विद्यार्थिनीनी घोषणाबाजी करत जनजागृती केली, शिवाय शाळांसह नागरिकांच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन मुलींचे महत्त्व पटवून देण्यात आले.
उंब्रज परिसरात महिला, मुलींच्या छेडछाडी करणाऱ्यांवर पोलिसांनी वारंवार जरब बसवली आहे. शिवाय गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत त्यांना कायद्याने धडा शिकवला आहे. हे करत असतानाच शासन उपक्रम म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल पाटील, महिला पोलीस कल्याणी काळभोर, सुनिता पवार यांच्यासह कन्या शाळा उंब्रजच्या मुख्याध्यापिका सौ माने मॅडम व इतर शिक्षक स्टाफ यांचे पुढाकाराने जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. बेटी बचाओ... बेटी पढाओ या घोषवाक्याचे फलक घेऊन घोषणा देत रॅली काढण्यात आली. उंब्रज परिसरातील नागरिकांशी, महिलांशी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींशी पोलिसांनी संवाद साधला. या जनजागृती रॅलीने उंब्रजकर सुखावले. पोलिसांच्या उपक्रमाचे उंब्रजकरांनी कौतूक केले. प्रभारी अधिकारी रविंद्र भोरे म्हणाले, मुलींनी आता प्रत्येक क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे. देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिलांना सन्मान मिळाला आहे. सैन्यदल, नेव्ही, पोलीसदल यासारख्या आव्हानात्मक क्षेत्रातही आज मुली आघाडीवर आहेत. त्यांचे लक्षवेधी योगदान महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे मुलींना शिक्षण देणे अन् उच्चपदस्थ करणे हे ध्येय ठेवणे काळाची गरज आहे.