सातारा : धोम धरणाच्या डाव्या कालव्यात तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि संघर्ष समित्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास १८ जून रोजी जलसिंचन मंडळ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बर्गे, कार्याध्यक्ष रणजीत फाळके तसेच संयुक्त पाणी वाटप संघर्ष समितीचे एस. डी. माने आणि नंदकुमार माने यांनी अधीक्षक अभियंता, जलसिंचन मंडळ सातारा यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.
समितीच्या माहितीनुसार, १३ जून रोजी धोम धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन बंद करण्यात आले. या निर्णयामुळे कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून शेतीपिके आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढली आहे. याविरोधात १५ जून रोजी जलसिंचन विभागासमोर ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते.
आंदोलनानंतर झालेल्या चर्चेत संबंधित अधिकाऱ्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून कालव्यात पाणी सोडण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविल्याचे समितीचे म्हणणे आहे. मात्र अद्याप प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे.
मान्सूनच्या आगमनास विलंब झाल्याने सातारा व कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवत आहे. धोम डावा कालवा हा या भागातील शेतीसाठी महत्त्वाचा जलस्रोत असल्याने कालवा बंद राहिल्यास खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
समितीने प्रशासनाला १७ जूनपर्यंतचा अवधी दिला असून, त्यानंतरही पाणीपुरवठा सुरू न झाल्यास १८ जून रोजी जलसिंचन मंडळाच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनात कालवा क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
"शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने विलंब न करता कालवा सुरू करावा. अन्यथा पुढील आंदोलनाची जबाबदारी प्रशासनाची राहील," अशी भूमिका संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.