सातारा : शहरातील बुधवार पेठ परिसरातील एका बांधकामावरून सुरू असलेला वाद आता चांगलाच पेटला आहे. संबंधित बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप युसूफ कच्छी यांनी केला होता. मात्र, हे सर्व आरोप पूर्णपणे धादांत खोटे असून, केवळ पैशांची मागणी करण्यासाठी आणि ब्लॅकमेलिंगच्या हेतूनेच आपल्यावर हे आरोप केले जात असल्याचा थेट पलटवार प्रवीण निवास पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आपण अशा कोणत्याही दबावाला किंवा धमक्यांना मुळीच बळी पडणार नसून, अशा प्रकारची ब्लॅकमेलिंगची वृत्ती कदापि खपवून घेतली जाणार नाही, असा सडेतोड इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण पाटील यांनी संबंधित बांधकामाबाबतची आपली बाजू स्पष्ट केली. बुधवार पेठेतील हे बांधकाम सातारा नगरपालिकेच्या सर्व नियमांना आणि कायदेशीर चौकटीला धरूनच सुरू आहे. या जागेचा खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेतूनच पार पडला आहे. बांधकामासाठी आवश्यक असणारा अर्ज सातारा नगरपालिका प्रशासनाकडे आधीच सादर करण्यात आलेला आहे. आजपर्यंत पालिका प्रशासनाकडून या बांधकामाबाबत कोणतीही नोटीस आपल्याला बजावण्यात आलेली नाही. तसेच, संबंधित जागेवर नगरपालिकेचे कसलेही आरक्षण झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडून या बांधकामाला स्थगिती मिळवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले होते, मात्र न्यायालयाने स्थगिती देण्याची ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. युसूफ कच्छी यांनी आपल्याकडे वारंवार पैशांची बेकायदेशीर मागणी केली होती, परंतु आपण त्यांच्या या मागणीकडे सतत दुर्लक्ष केल्यानेच चिडून जाऊन त्यांनी आपल्याविरोधात वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आणि खोटे आरोप करण्यास सुरुवात केली आहे, असा गंभीर दावा पाटील यांनी केला.
आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करताना पाटील म्हणाले की, आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आणि आपण कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्व पावले उचलत आहोत. तरीही पालिका प्रशासनाने हे बांधकाम नियमबाह्य असल्याचे घोषित करून ते हटवण्याचे निर्देश दिले, तर ते स्वतःहून काढण्याची आपली पूर्ण तयारी आहे. याच वेळी त्यांनी युसूफ कच्छी यांच्या भूतकाळातील व्यवहारांवरही बोट ठेवले. 2013 मध्ये कच्छी यांनी बेकायदेशीर व्यवहार केल्याचा दावा करत, त्यांचे विविध कारनामे सातारकरांना चांगलेच ठाऊक असल्याचा आरोपही प्रवीण पाटील यांनी केला.
बुधवार पेठेतील ‘ते’ बांधकाम नगरपालिकेच्या नियमानुसारच; प्रवीण पाटील यांचा युसूफ कच्छी यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप
by Team Satara Today | published on : 16 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा