टेंभुर्णीत वाघाची कातडी आणि हस्तिदंतसह व्यापारी अटकेत

by Team Satara Today | published on : 23 June 2025


सोलापूर : वाघाची कातडी आणि हस्तिदंत बाळगल्याप्रकरणी टेंभुर्णी येथील एका व्यापाऱ्याला सोलापूर नियंत्रण कक्ष आणि टेंभुर्णी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शनिवारी (२१ जून) सायंकाळी सहा वाजता अटक केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमोल विजयकुमार शहा (वय ४५, रा. ढवळेनगर, टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो रंगांच्या व्यवसायाशी संबंधित असल्याचे समजते. पोलिसांनी त्याच्याकडून वाघाची कातडी आणि हस्तिदंत जप्त केले आहेत.

ही कारवाई वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार करण्यात आली असून, या प्रकरणामागे वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास सुरु असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

वाघाची कातडी आणि हत्तीचा दात तस्करीसाठी बाळगल्याप्रकरणी टेंभुर्णी येथील व्यापारी अमोल विजयकुमार शहा (वय ४५, रा. ढवळेनगर, टेंभुर्णी) यास सोलापूर नियंत्रण कक्ष व टेंभुर्णी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शनिवारी (२१ जून) अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक वाघ सदृश कातडी आणि हत्तीचा एक दात जप्त करण्यात आला असून, त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये आहे.

सोलापूर नियंत्रण कक्ष आणि टेंभुर्णी पोलिसांना टेंभुर्णी परिसरात वन्यजीव अवयवांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्या आधारे पोलिस निरीक्षक नारायण पवार व नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक भिंताडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

संशयित अमोल शहा याच्या ढवळेनगर येथील राहत्या घरी छापा टाकण्यात आला. झडती दरम्यान, प्लास्टिकच्या पिशवीत सुकवलेले व कडक झालेले वाघ सदृश प्राण्याचे कातडे व हत्तीचा एक दात सापडला. प्राथमिक तपासात, या अवयवांची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात अमोल शहा याला अटक करून माढा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी वन्यजीव तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.

ही कारवाई अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी,अप्पर अधीक्षक साहेब प्रीतम यावलकर. उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश जगताप, पोलीस कॉन्स्टेबल गणेश इंगोले , पोलीस मुख्यालया तील अंमलदार विवेकानंद कडलास्कर, सचिन मळगे, संदीप गोतसुर्वे, गोविंद थोपटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शितल जगताप व वन विभागाचे शुभम धायतडक यांनी केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वरमधील हॉटेलमध्ये युवतीची आत्महत्या
पुढील बातमी
मार्ली-भालेघर रस्ता खचला

संबंधित बातम्या