सातारा : कराड येथील ईदगाह मैदान येथे दफण विधी, रमजान ईद व बकरी ईद निमित्त सार्वजनिक नमाज पठण करण्यासाठी अडचणी येत आहेत, असे सांगून ईदगाह ट्रस्टच्या सदस्यांनी केलेल्या मागण्यांबद्दल सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
कराड येथील ईदगाह जमिनी संदर्भात पालकमंत्री कार्यालयात पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षकांनी जागेची पहाणी करावी. कोणाचीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, तेथील रस्ता नगर परिषदेमार्फत तयार करण्यात येईल, असेही पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.
सोलर हायमास्ट दिवे बसविण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करा :
पाटण तालुक्यातील नाडे, सांगवड, चोपदारवाडी, गव्हाणवाडी व मरळी या रस्त्यांवर सोलर हायमास्टर दिवे बसविण्यात येणार आहे. याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशा सूचना करुन पालकमंत्री देसाई यांनी केल्या.
सोलर पॅनलसाठी जिल्हा नियोजन व दिव्यांसाठी नाविन्यपूर्ण योजनेतू निधी उपलब्ध करुन दिला जाईल. सोलर पॅनेल हे सार्वजनिक इमारतींवर बसवावे. या कामासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. हे काम करीत असताना गुणवत्ता व दर्जा चांगला राहिला पाहिजे, अशाही सूचना पालकमंत्री देसाई यांनी केल्या.