कुष्ठरोग शोध मोहिमेत तपासणीसाठी सहकार्य करा-जिल्हाधिकारी संतोष पाटील; जिल्हा समन्वय समितीची बैठक

by Team Satara Today | published on : 10 November 2025


सातारा :  केंद्र शासनाचे सन २०२७ पर्यंत कुष्ठरोगाच्या संसर्गाचे प्रमाण शून्यावर आणणे हे ध्येय असून येत्या 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. ही शोध मोहिमेसाठी येणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यासाठी जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संजय कुंभार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कुष्ठरोग हा संथ गतीने वाढणारा आजार आहे. कुष्ठरोगाची संशयित लक्षणे म्हणजे, हातापायाला मुंग्या येणे, हाता पायातील ताकद कमी होणे, हातातून वस्तु, पायातून चप्पल गळून पडणे, त्वचेवर फिक्कट पांढरा लालसर बधीर असा च‌ट्टा असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, त्वचेवर गाठी येणे अशी लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.

२६ लाख ६० हजार ९९० लोकसंख्येची तपासणी करणार

या मोहिमेमध्ये आशा कार्यकर्ती व पुरुष स्वयंसेवकाच्या २ हजार ८६१ पथकामार्फत ग्रामीण भागातील सपूर्ण लोकसंख्येची तर शहरी भागातील जोखमीच्या लोकसंख्येची कुष्ठरोगासाठी तपासणी करणार आहोत. ग्रामीण भागातील २५ लाख ४८ हजार ८५३ व शहरी भागातील १ लाख १९ हजार १३७ असे एकूण २६ लाख ६० हजार ९९० लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार असल्याचे सहायक संचालक डॉ. गायकवाड यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
टाटा पॉवर एनर्जीच्या विरोधात साताऱ्यात कामगारांचे घोंगडी आंदोलन; भूमिपुत्र कामगारांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात मागितली दाद
पुढील बातमी
चोरलेल्या दुचाकीप्रकरणी वनवासवाडीतील एक जण ताब्यात

संबंधित बातम्या