पोषणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न; ९ वा राष्ट्रीय पोषण माह-२०२६ सुरू

by Team Satara Today | published on : 09 September 2026


सातारा : कुपोषण निर्मूलन आणि पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत ९ वा राष्ट्रीय पोषण माह-२०२६ सुरू करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात दीपप्रज्वलन व ‘पोषण गुढी’चे पूजन करून उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात सातारा प्रकल्पाच्या वतीने पोषण विषयावरील भारूड, कोरेगाव प्रकल्पाच्या वतीने रक्तक्षयाबाबत जनजागृती करणारे पथनाट्य, तर फलटण प्रकल्पाच्या वतीने पौष्टिक पाककृतींचे प्रदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी आणि अंगणवाडी सेविकांना पोषणाची तसेच ‘मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर’ उपक्रमाची शपथ देण्यात आली.
राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत आहारातील विविधता, प्रथिनयुक्त आहार, ताजे व पौष्टिक अन्न, बालकांचा बौद्धिक विकास आणि मातृ आरोग्य याबाबत जिल्हाभर जनजागृती करण्यात येणार आहे. पौष्टिक पाककृतींची प्रात्यक्षिके, पोषण मेळावे, भोजनाच्या गुणवत्तेची तपासणी आणि विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त पात्र गर्भवती व स्तनदा मातांची नोंदणी, योजनेच्या लाभाबाबत जनजागृती आणि थेट लाभ हस्तांतरणाला गती देण्यावरही भर देण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर जिल्हा परिषद प्रांगणापासून पोवई नाक्यापर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली. यामध्ये अंगणवाडी सेविका, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजुभैय्या भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे, विविध समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षिका सारिका ढाणे यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऊसदराचा तिढा पेटणार; प्रतिटन किमान ३०० रुपयांची वाढ देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
पुढील बातमी
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मॉर्फ केलेला फोटो प्रसारित केल्याप्रकरणी कारवाईची भाजपची मागणी

संबंधित बातम्या