सातारा : आयुर्वेदिक औषधनिर्मिती क्षेत्रातील लघुउद्योजकांच्या समस्या, उत्पादनांची गुणवत्ता आणि उद्योगविस्तारासाठी आवश्यक धोरणात्मक उपाय यांवर साताऱ्यात झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात चर्चा करण्यात आली. औषधांची सुरक्षितता आणि दर्जा कायम ठेवतानाच उत्पादकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने लक्ष द्यावे, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली.
आयुष स्मॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन गुरुवारी (दि. २२) सातारा येथे झाले. दीपक श्रीकृष्ण महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाला आयुर्वेदिक औषधनिर्मिती क्षेत्रातील उद्योजक आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
इंदू के फार्म प्रा. लि., पुणेचे संचालक डॉ. रामदास कुटे यांनी महाराष्ट्रातील आयुर्वेदिक उत्पादनांच्या परंपरेचा उल्लेख केला. या क्षेत्राचा विस्तार करताना औषधांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेशी तडजोड होता कामा नये. त्याचबरोबर उत्पादकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण होणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. देशभरातील नियमांच्या अंमलबजावणीत सुसूत्रता राखण्याची आवश्यकताही त्यांनी अधोरेखित केली.
संघटनेचे उपाध्यक्ष सुरेंद्र काकडे यांनी लघुउत्पादकांच्या समस्या संघटितपणे मांडण्यावर भर दिला. उत्पादकांना एकत्र आणणे, त्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचविणे आणि आयुर्वेदिक उद्योगाच्या विकासासाठी प्रयत्न करणे, ही संघटनेची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी टिकविण्यासह उद्योगवाढीसाठीही संघटना प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयुर्वेदिक औषधनिर्मिती क्षेत्रातील लघुउद्योजकांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या अडचणींवर प्रभावी उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा अधिवेशनातून व्यक्त करण्यात आली
लघु आयुर्वेदिक उद्योगांच्या प्रश्नांसाठी राज्यस्तरीय व्यासपीठ असावे; साताऱ्यात राज्यस्तरीय अधिवेशनात मागणी
आयुष स्मॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे पहिले अधिवेशन; नियमांतील सुसूत्रता आणि उद्योगवाढीवर भर
by Team Satara Today | published on : 22 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा