जळगाव : भडगाव तालुक्यातील शिवणी येथे शेतात वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर नजीकच पत्र्याच्या शेडमध्ये बंगळीवर १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आलेली ही घटना घातपात की आत्महत्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संजय साहेबराव चव्हाण ( वय ४८ ) असे मयत बापाचे तर व समर्थ ऊर्फ कौशिक संजय चव्हाण ( वय १२ ) असे मयत मुलाचे नाव आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पत्नी साधनाबाई व दोन मुले असा संजय चव्हाण यांचा परिवार आहे. संजय चव्हाण यांचा मोठा मुलगा औषधशास्त्राचे शिक्षण घेऊन इंदोर येथे नोकरी करतो. तो अविवाहीत आहे. तर लहान कौशीक ऊर्फ समर्थ हा इयत्ता सहावीत शिकत होता.
संजय चव्हाण हे मध्यतंरी सुरत येथे एका स्कूल बसवर होते. त्यानंतर शिवणीत रिक्षा चालवत व सासूबाईंच्या मालकीची शेती करत होते, करोना काळात चव्हाण यांच्या सासूचे निधन झाले. त्यानंतर शेतीवरच चव्हाण कुटुंबियांचा उदरनिर्वाह सुरु होता.
पत्नी शेतात पोहचली, पण तोपर्यंत सर्व संपलं होतं
शनिवारी शाळेला सुट्टी तर दुसऱ्या दिवशी रविवारी समर्थांचा पाठ असल्याने साधनाबाई यांनी कौशिकला कटींग करुन ये म्हणून सांगितले. तो दुकानावर जात असतानाच कौशिकला त्याचे वडील संजय चव्हाण यांनी हटकले. आज शनिवार आहे, केस कमी करु नको, असं म्हणत शेतावर थोडं काम आहे, म्हणून सोबत चल असं सांगितले.
संजय चव्हाण यांनी त्यांच्यासोबत मुलाला शेतात नेले, पत्नी साधनाबाई यांना सुद्धा चव्हाण यांनी नेहमीप्रमाणे शेतावर येण्यास सांगितले. कौशिक आणि संजय चव्हाण हे बापलेक शेतात पुढे निघाले, तर एका आजीबाईंशी गप्पा मारण्यात वेळ गेल्यामुळे साधनाबाई यांना शेतात जाण्यास उशीर झाला.
आजीबाई निघून गेल्यानंतर साधनाबाई शेतात पोहोचल्या, तर त्यांना शेतात निंबाच्या झाडाला पती गळफास घेतलेल्या अवस्थेत तर मुलगा शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या खाटेच्या बंगळीवर निपचित पडलेला दिसला. हे पाहून साधनाबाईंना मोठा धक्का बसला, त्यांनी फोडलेल्या हंबरड्याचा आवाज ऐकून नजीकच्या शेताजवळचे शेतकरी धावून आले, त्यांनी साधनाबाईला घरी नेते. त्यानंतर घटनेची माहिती समोर आली व ही घटना भडगाव पोलिसांना कळविण्यात आली. तर निपचित पडलेल्या कौशिकला तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले.
एकाचवेळी बापासोबत मुलाच्या अंत्ययात्रेने सर्व गाव सुन्न
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, उपनिरीक्षक शेखर डोमाळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक पाडूरंग सोनवणे यांनी घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा केला. संजय चव्हाण यांनी मुलाचा जीव घेतल्यानंतर आत्महत्या केल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकं आत्महत्या की घातपात हे समोर आलेलं नाही. तर मुलगा कौशिक याचा नेमका मृत्यू कशाने झाला हे सुद्धा समोर आलेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर कौशिक याच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे.
दरम्यान सर्व काही सुरळीत असताना संजय चव्हाण यांनी एवढ्या टोकाचं पाऊल का उचललं, तर दुसरं म्हणजे सोन्यासारख्या लेकराचा म्हणजेच कौशिकचा दोष काय, त्याच्यासोबत असं का घडलं? असे वेगवेगळे प्रश्न गावकऱ्यांमधून उपस्थित केले जात आहे. एकाचवेळी बापासोबत मुलाच्या अंत्ययात्रेने सर्व गाव सुन्न झाले आहे.
सद्यस्थितीत भडगाव पोलीस ठाण्यात घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहे.