सातारा : सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांना निधी उपलब्ध असूनही गेल्या दोन वर्षांपासून कामे रखडलेली आहेत. पर्यटनवाढीच्या दृष्टीने ही कामे शासनाने हाती घेतली आहेत, तरी या कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांचा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आढावा घेतला. या बैठकीला जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, कार्यकारी अभियंता राहूल अहिरे, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कुसवडे कारवट, कोयना रासाटी, पानेरी, निवळी, मेंढेघर येथील पर्यटन आराखड्यातील कामे व हेळवाक, येराड जलपर्यटन केंद्रांच्या कामाचा आढावा घेतला. या सर्व कामांना निधी उपलब्ध आहे, ठेकेदाराला सांगून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्ते कामे पूर्ण करावी व पावसाळ्यात जी कामे करता येतील त्या कामाचे साहित्य आत्तापासून संबंधित ठिकाणी टाकावे. या कामांचे मंजुरीचे प्रस्ताव ज्या विभागाकडे प्रलंबित आहेत, अशा प्रस्तावांची यादी द्यावी संबंधित विभागाशी चर्चा करुन प्रस्तावांना तातडीने मंजुरी मिळवून देण्याचे कामही केले जाईल.
बामणोली येथील गोदाम नुतनीकरणाचे काम सुरु आहे. तेथील काही नागरिक या कामात अडथळा आणत आहेत, हे काम सुरळीत सुरु राहण्यासाठी व तातडीने पूर्ण होण्यासाठी जे कामात अडथळा आणतील त्यांच्यावर पोलीस विभागामार्फत कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत केल्या.