- श्रीकांत जाधव
उंब्रज : बुलेटच्या मूळ सायलेंसरमधे बदल करून कर्णकर्कश आवाजात बुलेट चालवणार्यांचे नियमबाह्य फटाके उंब्रज पोलिसांनी बंद केले आहेत. सायलेंसरमधे बदल केलेल्या बुलेटसह फॅन्सी नंबरप्लेट वापरणार्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करत 17 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या उपस्थितीत उंब्रज परिसरात अचानक झालेल्या या कारवायांनी नियम न पाळणार्या वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली.
उंब्रज परिसरात सेवारस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. या वर्दळीत काही वाहनधारक बुलेटच्या सायलेंसरमधे बदल करून कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर बसवत आहेत. वेगाने बुलेट चालवून उंब्रजकरांना नाहक मनस्ताप देणारा फटफट आवाज बंद करण्याच्या अनेक नागरिकांच्या मागण्या होत्या. त्या उद्देशाने ही कारवाईची मोहिम राबवण्यात आली.
उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी उंब्रज परिसरात दोन ठिकाणी पोलीस तैनात करत अचानक कारवाईला सुरूवात केली. बुलेटवाल्यांना पकडून त्यांचे मॉडिफाय केलेल्या सायलेंसरबाबत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. महाविद्यालय परिसरात अनेक युवक फॅन्सी नंबरप्लेट लावून वाहने धुमस्टाईलने पळवताना आढळले. त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सलग दोन तास कारवाईची मोहिम राबवत पोलिसांनी बुलेटस्वारांवर व इतर वाहतुकीचे नियम न पाळणार्यांवर कारवाई केली. यापुढे नागरिकांना मनस्ताप होईल किंवा अपघातास कारणीभूत ठरेल अशाप्रकारे वाहने चालवणार्यांवर यापुढेही कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला असून वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
उंब्रज परिसरातही अनेक पालक अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देत आहेत. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास या घटनेला पालकही जबाबदार राहणार आहेत. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांच्या ताब्यात वाहने दिल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा रविंद्र भोरे यांनी दिला आहे. या इशार्याचे सर्वजण समर्थन करीत आहेत.