विद्युत सहायकपदाच्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी शेवटची संधी

महावितरणकडून दि. ९ व १० सप्टेंबरला पडताळणी

by Team Satara Today | published on : 02 September 2025


मुंबई : महावितरणमध्ये विद्युत सहायकपदी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. २० ते २२ ऑगस्टला पूर्ण झाली आहे. तथापि राज्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थिती तसेच इतर कारणांमुळे गैरहजर असलेल्या काही उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दि. ९ व १० सप्टेंबरला शेवटची संधी देण्यात आली आहे.

महावितरणने जाहिरात क्र. ०६/२०२३ अन्वये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेले उमेदवार व त्यांना वर्ग केलेल्या परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये दि. २० ते २२ ऑगस्ट दरम्यान करण्यात आली आहे. मात्र या तीनही दिवसांत राज्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती तसेच काही अपरिहार्य कारणांमुळे निवड झालेल्या ज्या उमेदवारांना उपस्थित राहता आले नाही, अशा काही गैरहजर उमेदवारांना मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे.

त्यानुसार आता दि. ९ व १० सप्टेंबरला गैरहजर उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे, प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये होणार आहे. सकाळी १० वाजता ही कार्यवाही सुरू होईल. त्यासाठी संबंधित उमेदवारांनी स्वतः सर्व मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे. जे उमेदवार आणखी एक संधी देऊनही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी हजर राहणार नाही त्यांची निवड रद्द समजली जाईल व भविष्यात त्यांच्याशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांच्या छाननी व पडताळणीमध्ये विद्युत सहायकपदी निवड झालेल्या जे उमेदवार पात्र होतील त्यांच्या नियुक्तीबाबत संबंधित परिमंडलांमध्ये पुढील कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणला तालुका संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको
पुढील बातमी
ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता व सौ इंदुमती मेहता यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरी सत्काराचे आयोजन

संबंधित बातम्या