सातारा : सातारा शहरातील जवळपास दीडशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्ते व अध्यक्ष यांनी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता सदाशिव पेठेतील मंडईचा राजा गणपती मंडळाच्या प्रांगणात तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान डेसिबलचे बंधन पाळून स्वयंशिस्तीने आटोपशीर वेळेत मिरवणूक पूर्ण करणे आणि पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सवाच्या परंपरेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे, यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सुमारे दीड तास ही बैठक सुरू होती.
या बैठकीमध्ये माजी उपनगराध्यक्ष अशोक मोने, खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक व भाजपच्या सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण यासह सातारा शहरातील विविध मंडळांच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष उपस्थित होते. सातारा शहरातील व्यापारी व गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये गैरसमजाचे वातावरण तयार झाले होते. या गैरसमजावर सामंजस्याने पडदा टाकण्यात आला. सातारा शहराच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक आणि एकोप्याची परंपरा आहे. जे गैरसमज झाले त्याबद्दल व्यापारी महामंडळाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी सुद्धा या बैठकीमध्ये कोणतेही गैरसमज होणार नाहीत तसेच राजपथावर गणेश मिरवणूक निघताना स्वयंशिस्त पाळली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिल्याने वादावर पडदा पडला आहे. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये मार्गांची डागडुजी, तसेच पोलीस विभागाचे लागणारे सहकार्य, ध्वनी संयोजक अथवा डॉल्बी संयोजक यांच्यामध्ये गणेशोत्सव मंडळाच्या निमित्ताने स्पर्धा लागते ती स्पर्धा टाळणे, मिरवणुकी दरम्यान दोन मंडळांमध्ये अंतर पडणार नाही याची काळजी घेणे, गणपतीच्या मिरवणुकीमध्ये कोणाकडूनही बीभत्स नृत्य होणार नाही याची काळजी घेणे, मिरवणुकीची सुरुवात आणि मिरवणुकीचा शेवट शांततामय मार्गाने आणि वेळेत होईल याची काळजी घेणे, तसेच पोलिसांना गणेशोत्सव मंडळांनी पूर्ण सहकार्य करणे, राजपथावरून मिरवणूक जात असताना डेसिबल मर्यादा पाळूनच पारंपारिक वाद्य यांना परवानगी मिळणे, त्याचबरोबर या निमित्ताने जे खटले गणेशोत्सव मंडळांवर दाखल झालेले आहेत ते मागे घेण्यासंदर्भात मंडळांनी पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा करणे यासारख्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या चर्चेतून सर्व गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधित्व करणारी एक सुकाणू समिती स्थापन करणे, त्याचे पदाधिकारी निवडणे आणि त्या शिष्टमंडळाने शहरातील गणेशोत्सवाचे नियमन करणे या संदर्भामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. या बैठकीनंतर त्याची नियमावली बनवून त्या संदर्भातील सांगोपांग नियम आणि शिष्टमंडळाचे म्हणणे याचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांना दिले जाणार आहे. त्याचबरोबर खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांचीही भेट घेऊन त्यांच्यासमोर गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन
सातारा शहरातील दीडशे गणेश मंडळांची तातडीची बैठक; सुकाणू समिती स्थापन करण्याच्या हालचाली
by Team Satara Today | published on : 09 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा