सातारा : अरबी समुद्रामध्ये सातत्याने कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत असल्याने पश्चिम महाराष्ट्रासह घाटमाथा तसेच सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सातारा जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन ठप्प झाले आहे. दरम्यान दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असून आपत्ती निवारण कक्षाचे मदतकार्य सुरू झाले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेत तातडीने मदतीच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाटण तालुक्याचा दौरा करत तेथील नागरिकांशी पूरसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला.
सातार्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम असल्याने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील 129 कुटुंबातील 361 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. कोयना धरणासह धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळे या प्रमुख धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पाटण तालुक्यातील पाटण शहरात 13 कुटुंबातील 45, हेळवाक येथील पाच कुटुंबातील 17, नावडी औंध वस्ती येथील सात कुटुंबातील पंधरा, कराड तालुक्यातील कराड शहर पत्राचाळ पाटण कॉलनी कोयना दूध कॉलनी रुक्मिणी नगर येथील सहा कुटुंबातील 24, महाबळेश्वर तालुक्यातील येरणे बुद्रुक येथील आठ कुटुंबातील 18, वाई शहरातील 40 कुटुंबातील 135, सातारा तालुक्यातील भैरवगड येथील 30 कुटुंबातील 65, मोरेवाडी येथील वीस कुटुंबातील 42 अशा 361 नागरिकांचे स्थलांतर प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
रस्त्यावर पाणी आल्याने पाटण तालुक्यातील नेरळे पूल, मुळगाव पूल, पाबळ नाला रोड बंद ठेवण्यात आला आहे. कराड, जावली, सातारा तालुका, वाई या चार ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
सातारा शहरानजीकच्या माहुली येथील अंत्यविधीसाठी वरदान असणारी कैलास स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली होती. येथील सातही अग्नीकुंड पाण्याखाली गेल्याने अंत्यसंस्काराची मोठी अडचण निर्माण झाली होती. बालाजी ट्रस्ट व्यवस्थापन जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून पर्यायी व्यवस्थेच्या तयारी मध्ये होते. मात्र, आज पाऊस थोडा कमी झाल्याने कृष्णा नदीचे पात्र घटले. त्या अनुषंगाने बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी कैलास स्मशानभूमीच्या वरच्या टप्प्याची स्वच्छता करुन घेतली असून अंत्यसंस्कारांसाठी सोय करुन दिली आहे.
कृष्णा नदीवरील अहमदाबाद किडगाव पूल, करंजे म्हसवे पूल,मौजे जिहे कटापूर रोडवरील पुलावरून पाणी गेल्याने हे रस्ते बंद करण्यात आले आहेत. खंडाळा तालुक्यातील नीरा नदीवरील लोणंद वीर रस्ता, नीरा नदीवरील जुना पाडेगाव येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. भिलार तालुका महाबळेश्वर येथील केंद्रप्रमुखांचे कार्यालय असणार्या खोलीच्या भिंतीची पडझड झाली आहे. महाबळेश्वर येथेही तब्बल 156.4 मिमी पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत महाबळेश्वर मध्ये 2631 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. वेण्णा लेक पासून जुन्या क्षेत्र महाबळेश्वर कडे जाणार्या रस्त्यावरअतिवृष्टीमुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जावळी तालुक्यातील विशेषत: कास बामणोली पट्ट्यातील बरेच रस्ते पुढे तुडुंब झाल्याने पाण्याखाली गेलेले आहेत. नवजा, कोयना नगर येथील पाबळ नाला रस्ता जास्त खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक स्थगित करण्यात आली असून याबाबतचे दुरुस्तीचे काम पाऊस उघडल्यानंतर केले जाईल, असे बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
कोयना धरणातून 95300 क्युसेक, धोम धरणातून 17121 क्युसेक, धोम बलकवडी धरणातून 7158 क्युसेक, कण्हेर धरणातून 14726 क्युसेक, उरमोडी धरणातून आठ हजार 936 क्युसेक, तारळी धरणातून 3432 क्युसेक, वीर धरणातून 5587 पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सकाळी दहा वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती पुढील प्रमाणे- सातारा तालुका 45.2 मिलिमीटर, जावळी तालुका 39.4 मिलिमीटर, पाटण तालुका 34.5 मिलिमीटर, कराड 33 मिलिमीटर, कोरेगाव 45.4 मिलिमीटर, खटाव 19.6 मिलिमीटर, माण 9.1 मिलिमीटर, फलटण 12.2 मिलिमीटर, खंडाळा 21.8 मिलीमीटर, वाई 46 मिमी महाबळेश्वर 156.4 मिलिमीटर.