वाई : महाबळेश्वर येथील हॉटेल व्यज्ञवसायिकाची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो, असे सांगून एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे नेमणुकीस असलेल्या अपर पोलीस अधीक्षकांस अटक करण्यात आली आहे. त्यांस न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), कोल्हापूर यांच्याकडील तपासास असलेल्या प्रकरणाचा वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महाबळेश्वर येथील मेघदुत हॉटेलचे मालक यांना मद्य विक्री परवाना मिळवून देतो, असे सांगुन संशयित आरोपी श्रीकांत कोल्हापूरे याचे मित्र हनुमंत मुंढे व इतर साथीदारांच्या मदतीने हॉटेल मालक यांचा विश्वास संपादन करून दोन कोटी पन्नास लाख रुपये खर्च येणार, असे सांगितले व हॉटेल मालकाकडून एक कोटी पाच लाख रुपये रोखीने व चेकद्वारे घेवुन हॉटेल मालकाची फसवणूक केली आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हॉटेल मालक यांनी अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे तक्रार केली होती. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांनी तपास करून गुन्ह्याचे स्वरुप निष्पन्न झाल्यावर नऊ जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यापुर्वी हनुमंत विष्णुदास मुंडे, अभिमन्यु रामदास देडगे व बाळु बाबासाहेब पुरी यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश माळी, पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा कावडे, पोलीस अंमलदार विजय कुंभार, निवृत्ती पाडेकर, चालक जमीर मुल्ला व स्वप्नील जाधव यांनी आरोपीस ठाणे येथे ताब्यात घेतले. वाई न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे व गुन्हे अन्वेषण विभाग, (पुणे) पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस अधीक्षक श्रीमती मनिषा दुबुले तपास करीत आहेत.
फसवणूक प्रकरणी अपर पोलीस अधीक्षकास अटक
पाच दिवसांची पोलीस कोठडी
by Team Satara Today | published on : 08 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा