झाडाच्या फांद्या तोडताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 31 March 2026


​पाटण: शेतातील झाडाच्या फांद्या तोडत असताना उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा जोराचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आनंदा विष्णू मोहिते (वय ५६, रा. उमरकांचन, ता. पाटण) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

​मिळालेल्या माहितीनुसार, उमरकांचन येथील आनंदा मोहिते हे पानंदिवली शिवारातील आपल्या शेतात झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी गेले होते. येथील एका केंजळीच्या झाडावर चढून ते फांद्या छाटत असताना, तुटलेली एक फांदी जवळूनच गेलेल्या ३३ केव्ही विद्युत वाहिनीवर पडली. फांदी तारेत अडकल्याने त्यातून वीजप्रवाह उतरला आणि मोहिते यांना विजेचा भीषण धक्का बसला. हा धक्का इतका जोरात होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.

​या घटनेची माहिती दादाराम मोहिते यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण, हवालदार प्रशांत चव्हाण आणि धीरज मुळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृताचा देह शवविच्छेदनासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. पी. दोडके पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषदेतील राड्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण नाही; पीओपीच्या कामामुळे यंत्रणा बंद असल्याचे पत्राद्वारे स्पष्ट

संबंधित बातम्या