सातारा : राज्यातील महामार्ग वाहतूक पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) कर्मचाऱ्यांच्या परावर्तित सुरक्षा जाकीटवर (Reflective Safety Jacket) नावफलक व ओळख क्रमांक अनिवार्य करण्याच्या मागणीची पोलीस प्रशासनाने दखल घेतली असून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित परिक्षेत्रांना आदेश दिले आहेत.
नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रणवरे यांनी पोलीस महासंचालक आणि वाहतूक विभागाकडे पत्रव्यवहार करून सुरक्षा जाकीटवर नेमप्लेट बंधनकारक करण्याची मागणी केली होती. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई-बंगळुरू महामार्गासह इतर प्रमुख रस्त्यांवर वाहतूक पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बल जवान २४ तास सेवा बजावत असतात. कर्तव्यावर असताना कर्मचारी भगव्या अथवा केशरी रंगाचे परावर्तित सुरक्षा जाकीट परिधान करतात, ज्यामुळे त्यांच्या मूळ गणवेशावरील नाव व बकल नंबर झाकले जातात. महामार्गावर वाहनचालक व पोलिसांमध्ये वाद झाल्यास किंवा बनावट पोलिसांकडून तोतयागिरीच्या घटना घडल्यास संबंधित कर्मचाऱ्याची ओळख पटवणे कठीण होते.
केंद्रीय सुरक्षा दलांच्या धर्तीवर राज्य महामार्ग पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांच्या सुरक्षा जाकीटवर समोरच्या बाजूस स्पष्ट नाव, बकल क्रमांक किंवा क्यूआर कोड असावा, तसेच याबाबत संपूर्ण राज्यात एकसमान कार्यपद्धती (SOP) लागू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने ठाणे, रायगड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर परिक्षेत्रांच्या पोलीस अधीक्षकांना पत्राची प्रत पाठवून पुढील योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.