सातारा : अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात वाठार पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका महिलेकडून सुमारे 931 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत 23 हजार 275 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
वाठार-लोणंद मार्गालगतच्या वस्तीत एका महिलेकडून गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कार्यकारी दंडाधिकारी आणि पोलीस पथकाने संबंधित परिसरात छापा टाकला.
कारवाईदरम्यान संशयित महिलेची झडती घेतली असता तिच्याकडील पांढर्या बारदान्याच्या पिशवीत गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या पदार्थाचे वजन 931 ग्रॅम असून त्यामध्ये गांजाची पाने, फळे व बिया असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
या प्रकरणी रुपाली लक्ष्मण बुधावले (वय 32, रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) हिच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, नायब तहसीलदार सुनिता दिमते, पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, सहाय्यक फौजदार बुवासो वाघमारे तसेच वाठार पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्यांनी संयुक्तपणे पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव करीत आहेत.