गांजा तस्करी प्रकरणी दोघांना 20 वर्षे सक्तमजुरी; प्रत्येकी 2 लाखांचा दंड, सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

by Team Satara Today | published on : 20 July 2026


सातारा : तब्बल 86.100 किलो गांजाची बेकायदा वाहतूक व विक्रीच्या उद्देशाने ताब्यात बाळगल्याप्रकरणी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना 20 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन वर्षांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागणार आहे.

ही शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी (डीजे-2), सातारा यांनी सोमवारी (दि. 20 जुलै) दिली. शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये लक्ष्मण अंकुश जाधव (वय 32) आणि शंकर विलास जाधव (वय 36, दोघे रा. पळशी, ता. खटाव, जि. सातारा) यांचा समावेश आहे.

सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, 7 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत आरोपींकडून 5 लाख 16 हजार 600 रुपये किमतीचा 86.100 किलो गांजा, तसेच मोटारसायकल, सेंट्रो कार, दोन मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असा एकूण 7 लाख 73 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. सी. पोरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने आठ साक्षीदारांची साक्ष, परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर दस्तऐवज न्यायालयासमोर सादर केले. तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील संबंधित निर्णयांचा आधार घेत प्रभावी युक्तिवाद करण्यात आला. उपलब्ध पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी कुमार जाधव, अमित भरते, अर्चना मोटे आणि प्रतीक पवार यांनी खटल्याच्या पाठपुराव्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरात डिपॉझिटशिवाय गॅस पाइपलाइनची खुदाई; कंपनीला पालिकेची नोटीस
पुढील बातमी
जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादकता वाढ प्रकल्प राबवा - पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या