SQAAF बाह्य मूल्यांकनात छत्रपती शिवाजी कॉलेजला ‘अ प्लस ’ श्रेणी ; महाविद्यालयाच्या कार्याची राज्यस्तरीय दखल

by Team Satara Today | published on : 26 February 2026


सातारा – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत झालेल्या बाह्य मूल्यांकनात छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या महाविद्यालयास ‘अ+’ श्रेणी बहाल करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची ही राज्यस्तरीय दखल मानली जात असून या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांचे गुणवत्ता मूल्यांकन करण्यासाठी राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची निर्मिती करण्यात आली आहे.

सन 2024–25 मध्ये राज्यातील 1,00,675 शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले. त्यापैकी सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या 10,712 शाळांची सन 2025–26 मध्ये बाह्य मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी 10,644 शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण झाले असून केवळ 429 शाळांना ‘अ+’ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा यांचा मानाचा समावेश आहे.

सन 1947 मध्ये स्थापन झालेले हे महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय असून स्थापनेपासून आजपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा जपली आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देत ज्ञान, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न येथे करण्यात आला आहे. सध्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत असल्याचे पाहायला मिळते.

महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कार्यक्षमता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि पारदर्शक व्यवस्थापन या सर्व बाबींच्या आधारे ही श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. तसेच शासकीय नियमानुसार महाविद्यालयाच्या अधिकृत लेटर पॅडवर या ‘अ+’ श्रेणीचा उल्लेख करता येणार असल्याने संस्थेच्या गुणवत्तेला अधिकृत अधिस्वीकृती लाभली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, संघटक डॉ. अनिल पाटील, सहसचिव तसेच प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे व बी. एन. पवार यांनी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. पुढील काळातही गुणवत्तेचा ध्यास कायम ठेवत शैक्षणिक क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या उल्लेखनीय यशामुळे सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात महाविद्यालयाने मानाचा तुरा रोवला असून, गुणवत्तेच्या परंपरेला उजाळा देत उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात 'रंग मराठीचे, शब्द कवितेचे' उत्सव; 'आनंदघन' मंचावर बरसणार काव्य रसधारा; मराठी भाषा गौरवदिनानिमित्त जागर

संबंधित बातम्या