दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होऊन एनडीएसोबत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांवर शरद पवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. राजधानी दिल्लीत घडलेल्या दोन घटनांनी महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा विलिनीकरणाच्या चर्चेला तोंड फुटले. याची चर्चा सुरु असतानाच शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा देशभर सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्र येणार आहेत का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. शरद पवार म्हणाले, "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही", असे उत्तर पवारांनी दिले. एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चा वारंवार डोकं वर काढत आहेत, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वारंवार या चर्चा फेटाळून लावल्या जात आहे.
काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आम्ही एनडीएसोबत जाणार नाही, असे म्हटले होते. पण, त्यानंतर मागील काही दिवसांत दिल्लीतील भेटीगाठींनी या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
आधी मोदींची, नंतर शाहांची भेट
शरद पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी (२७ जुलै) खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट घेतली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या विषयाभोवती चर्चेने फेर धरला.