सातारा : लेखक, पत्रकार संग्राम निकाळजे यांचे 'लोकल टू ग्लोबल' हे पुस्तक गावाला जगाशी जोडणारा दुवा आहे. हे अत्यंत विधायक आणि रचनात्मक काम असल्याचे गौरवोद्गार थोर विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी येथे काढले.
लोकायत प्रकाशन निर्मित या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. साळुंखे यांच्या हस्ते सातारा येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी या पुस्तकाचे लेखक, पत्रकार संग्राम निकाळजे, ज्येष्ठ पत्रकार गजानन चेणगे, पत्रकार अरुण जावळे, लोकायत प्रकाशनचे प्रमुख राकेश साळुंखे आदी उपस्थित होते.
संग्राम निकाळजे यांनी विघातक गोष्टींकडून विधायक गोष्टींकडे कसे जाता येईल हा उद्देश ठेवून पत्रकारिता केली आहे. 'लोकल टू ग्लोबल' या पुस्तकातील लेखन त्यांनी त्या पद्धतीने केले आहे. फलटणजवळच्या एका छोट्या गावातून जगभरचा अनुभव घेत ते लोकल टू ग्लोबल पोहोचले आहेत. लोकल आणि ग्लोबल या दोन्ही गोष्टींचा दुवा बनून त्याची मांडणी करणे हे त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य आहे असे कौतुकोद्गार डॉ. साळुंखे यांनी यावेळी काढले. आजची युवा पिढी अशा वेगळ्या पद्धतीचे काम करत आहे आणि आपला विचार जगापुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे याचा आपल्याला अभिमान आहे असेही ते म्हणाले.
भ्रमंती आणि अफाट वाचन यातून संग्राम निकाळजे यांचे लेखन आकारास आले आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनात अनेक संदर्भ आले असून ते वाचकांच्या ज्ञानात भर घालतील असा विश्वास गजानन चेणगे यांनी यावेळी व्यक्त केला. स्वागत व प्रास्ताविक अरुण जावळे यांनी केले.