खंडाळा, दि. १२ : खंडाळ्यामध्ये खंबाटकी बोगद्याबाहेरील कॅनलजवळ दोन वाहनांना धडक देऊन ट्रेलर पलटी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नसली तरी एक जण जखमी झाले तर ट्रेलर व दोन चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामध्ये साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाताना खंडाळ्यात खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणाऱ्या कॅनल परिसरात भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने (आरजे14 जीक्यू 1640) समोरील दोन चारचाकी वाहनांना (एमएच03 इएक्स 7009 व एमएच14 जेएक्स5837) पाठीमागून जोराची धडक दिली व ट्रेलर पुढे जाऊन पलटी झाला. या घटनेमध्ये ट्रेलर व वाहनांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून पंकजकुमार यादव हा किरकोळ जखमी झाला आहे.
याप्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशनला स्वप्निल खन्ना याने दिलेल्या फिर्यादीवरून विनय महेश यादव (रा.मलहाचक, खिजरसराय, बिहार) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अंमलदार दत्ता दिघे हे करीत आहेत.