महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघाताने सातारा जिल्हा हादरला आहे. पर्यटनावरून परतणार्या युवकांची स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळल्याने आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमारे 800 फूट खोल दरी, घनदाट जंगल आणि अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्याला मोठे आव्हान उभे ठाकले.
घटनेनंतर पोलादपूर पोलीस, महसूल विभाग, स्थानिक ट्रेकर्स आणि स्वयंसेवी बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीला वरून दोरांच्या सहाय्याने दरीत उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मृतदेह ज्या भागात अडकले होते, तो परिसर अतिशय धोकादायक असल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात आला.
दाभिळ गावाच्या बाजूने सावित्री नदीपात्राकडून दरीत उतरून बचावकार्य सुरू करण्यात आले. अत्यंत कठीण परिस्थितीत जवान, ट्रेकर्स आणि स्थानिक स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून शोधमोहीम सुरू ठेवली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर काही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरितांसाठी मोहीम सुरूच आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदतीसाठी धावून आले. अंधार, पावसाळी वातावरण आणि निसरडे उतार यामुळे परिस्थिती बिकट असतानाही स्वयंसेवकांनी पथकांना आवश्यक साहित्य, मार्गदर्शन आणि मदत पुरवली.
अपघातातील युवक सातारा जिल्ह्यातील विविध गावांतील असून पर्यटनासाठी कोकणात गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांच्याशी संपर्क तुटल्यानंतर नातेवाईकांनी शोध सुरू केला. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवली आणि त्यातून हा भीषण अपघात उघडकीस आला.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातातील मृत युवक - रितेश राजेंद्र लोखंडे (22, आसगाव), सुहास जितेंद्र लोखंडे (20, आसगाव), करण आनंद शिंगटे (21, मर्ढे), निखिल अभिमन्यू शिंगटे (25, मर्ढे), महेश अनिल पवार (25, आसगाव), आदित्य अशोक साळुंखे (21, आसगाव), संदीप अशोक काटकर (37, खटाव), अंश समीर चव्हाण (19, बोरगाव, चिपळूण).
पोलिसांचे बचाव कार्य - मोबाईल लोकेशनच्या आधारे वाहनाचा शोध, पोलादपूर पोलीस आणि महसूल विभागाची संयुक्त मोहीम, दोरांच्या सहाय्याने दरीत उतरण्याचा प्रयत्न दाभिळ गावाच्या दिशेने पर्यायी मार्गाचा वापर, ट्रेकर्स आणि बचाव पथकांचा समन्वय.
माणुसकी धावली - स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीचा हात दिला, स्वयंसेवकांनी बचाव पथकांना मार्गदर्शन केले, अन्न, पाणी आणि साहित्याची व्यवस्था कठीण परिस्थितीतही रात्रभर शोधमोहीम सुरू, युवकांच्या नातेवाईकांना स्थानिकांकडून आधार.