फलटण : विलेपार्ले, मुंबई येथील सुमारे 26 वर्षांपूर्वी उभारलेले श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनाने मंदिर व्यवस्थापनाला कोणतीही संधी न देता जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ येथील जैन समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, घटनेचा निषेध करुन प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
मुंबई येथील घटनेच्या निषेधार्थ फलटण जैन समाजाच्यावतीने सोमवारी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरुन अधिकार गृह इमारतीजवळ आल्यानंतर तेथे छोटे खानी सभा झाली. यावेळी आ. सचिन पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष अमोल सस्ते, भाजप अल्पसंख्यांक सेलचे राज्य उपाध्यक्ष अनुप शहा, मंदिर महासंघाचे खंदारे, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, डॉ. जे. टी. पोळ यांनी मनोगत व्यक्त केले.
जैन समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्च्यात जैन समाजातील स्त्री- पुरुष, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी स्वीकारले.