फलटण : फलटण तालुक्यातील जाधववाडी येथील श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टच्या अश्विन कोजागिरी पौर्णिमा यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा आदेश लागू राहणार असून, यात्रेदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
जाधववाडी येथील श्री बिरदेव देवस्थानची यात्रा २४ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान होत असून, यात्रेस विविध समाजातील सुमारे साडेतीन ते पाच हजार भाविक उपस्थित राहत असतात. यापूर्वी यात्रेच्या अनुषंगाने दोन गटांमध्ये वाद होऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाचे समर्थक मोठ्या संख्येने एकत्र आल्यास वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊन भाविकांच्या सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती.
या सर्व परिस्थितीचा विचार करून पोलीस निरीक्षकांच्या प्रस्तावानुसार उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी सदर आदेश दिला आहे. या आदेशानुसार यात्रा कालावधीत देवस्थानच्या आसपासच्या परिसरात गर्दी करण्यास, वाद्य वाजविण्यास तसेच प्राण्यांचा बळी देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मात्र, हे प्रतिबंध देवस्थानच्या उत्सवकाळातील तसेच दैनंदिन धार्मिक विधींना लागू असणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक शांतता व सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फलटणमध्ये बिरदेव यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी; गर्दी, वाद्य व बळी देण्यास मनाई
by Team Satara Today | published on : 22 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा